स्त्री हे घरातील चैतन्य आहे. तिच्याविना घर अगदी सुने-सुने वाटते. घरामध्ये स्त्री असते, त्या वेळी ते घर भरल्यासारखे वाटते. त्यामागे हेच कारण असते की, तिच्यातील प्रकट-अप्रकट शक्तीमुळे देवीचे अस्तित्व जाणवून घरात प्रसन्न वाटत असते.
प्रत्येक स्त्रीमध्ये देवीतत्त्व असते. प्रत्येक स्त्रीने स्वतःमधील तुझे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करायला हवे. तुझी उपासना करून स्वतःमधील देवीतत्त्व टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
– एक साधिका
स्त्रियांनो, स्वतःतील देवीतत्त्व जागृत करण्यासाठी धर्माचरण आणि साधना करा !
आदिशक्तीला साकडे !
‘हे भवानीआई, तुझ्यावाचून मी भिकारी आहे. तुझ्या प्रेमात जो ओलावा आहे, तो या जगातल्या कोणत्याच गोष्टीत अनुभवायला मिळत नाही. माझे जीवन तुझ्या प्रेमाविना अपूर्ण आहे. भवानीआई, माझा जन्मही तुझ्या कृपाप्रसादामुळेच झाला आहे. तूच एका स्त्रीचे दुःख समजू शकतेस; कारण प्रत्येक स्त्री हा तुझाच अंश, तुझेच रूप असल्यामुळे तिचे दुःख समजून घेण्याची क्षमता केवळ तुझ्यातच असते. प्रत्येक स्त्रीमध्ये तुझाच वास असल्यामुळे त्याग करण्याची क्षमता तिच्यात अधिक असते. आई, प्रत्येक स्त्रीला ही क्षमता तुझ्यामुळेच प्राप्त होत असते. विश्वाचे कार्य सुरळीतपणे होण्यासाठी विष्णुदेवाला आदिशक्तीची आवश्यकता लागते. तुझ्याविना विश्वाचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही.
आई, विश्वाच्या कार्यासाठी, म्हणजे उत्पत्तीसाठी तुझ्या शक्तीरूपातील तत्त्वाची आवश्यकता असतेच. ‘जगज्जननी’ असल्यामुळे कुळाचा उद्धार करण्यासाठी तू प्रत्येक स्त्रीला शक्ती देतेस. हे भवानीमाते, प्रत्येक स्त्रीमध्ये तुझा वास असल्यामुळे बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत आंतरिक विचारप्रक्रियेत जो पालट होत जातो, तो केवळ तुझ्यामुळेच; कारण प्रत्येक स्त्रीमधील तुझी प्रकट-अप्रकट शक्ती अंतर्मनातून स्त्रीरूपाला घडवत असते. त्यामुळे संघर्ष आणि त्याग करून एका कुटुंबाच्या कुळाचा उद्धार करण्यात तिला यश मिळते. प्रत्येक कुळाचा उद्धार करण्यासाठी कुलदेवीची आवश्यकता असते.
हे माते, तूच आमच्यातील देवीतत्त्व जागृत कर. आम्हाला शक्ती प्रदान कर आणि हा स्त्रीजन्म सफल होण्यासाठी आमची साधना करून घे !
– एक साधिका