परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांमधून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

  • संतांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

  • ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘संत ईश्वराशी एकरूप झालेले असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असते. संतांच्या हस्ताक्षरातून चैतन्य प्रक्षेपित होते. त्यामुळे संतांची हस्तलिखिते जतन करण्याची हिंदूंची प्राचीन परंपरा आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदावरील समष्टी संत आहेत. ते ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांकडून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. मार्च २०२१ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांवर अनिष्ट शक्तींनी सूक्ष्मातून केलेल्या आक्रमणांमुळे त्यांची प्राणशक्ती अल्प होऊन त्यांना पुष्कळ थकवा आला. तसेच त्यांच्या शारीरिक त्रासांत वाढ झाली. रुग्णाईत असतांनाच्या काळातही (मार्च-एप्रिल मासांत) अल्पकाळ विश्रांती घेऊन त्यांचे ग्रंथ-संकलन, लिखाण पडताळणे या सेवा चालू होत्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

१. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

सर्वसाधारण व्यक्तीमध्ये रज-तमाचे प्रमाण अधिक असल्याने तिच्यात सात्त्विकता नसते. या चाचणीत तुलनेसाठी म्हणून एका तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीच्या हस्ताक्षराची निरीक्षणे करण्यात आली. या हस्ताक्षरामध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नव्हती; त्यामध्ये पुष्कळ प्रमाणात ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा आढळून आल्या आणि त्यांच्या प्रभावळी अनुक्रमे ७.२० मीटर आणि ६.१० मीटर होत्या. परात्पर गुरु डॉक्टरांच्या हस्तलिखितांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांमध्ये २२७ मीटर ते ३२८ मीटर सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसले, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण हे की, परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये ५ टक्के विष्णुतत्त्व असून ते जागृत होऊन कार्यरत झालेले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांकडून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. त्यांच्या हस्तलिखितांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चैतन्य आहे, तर प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये किती अधिक प्रमाणात चैतन्य असेल !

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रुग्णाईत असतांनाच्या हस्तलिखितामध्येसुद्धा पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे : परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती पुष्कळ अल्प असल्याने त्यांना जेव्हा बसून सेवा करणे शक्य होत नसते, तेव्हा ते पलंगावर झोपून सेवा करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले स्थूलदेहाने रुग्णाईत  असले, तरी ते सतत आनंदावस्थेत असल्याने (संतांचा मनोलय झालेला असल्याने, तसेच त्यांना देहबुद्धी अत्यल्प किंवा नसल्याने ते सतत आनंदावस्थेत असतात. – संकलक) आणि त्यांच्याकडून ईश्वरी कार्यासाठी पुष्कळ प्रमाणात विष्णुतत्त्व (चैतन्य) प्रक्षेपित होत असल्याने त्यांच्या रुग्णाईत असतांनाच्या हस्तलिखितामध्येसुद्धा पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.६.२०२१)

ई-मेल : [email protected]