गुलशन कुमार हत्या प्रकरणी १८ वर्षांनंतर अब्दुल रौफ मर्चंट याची जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाकडून कायम 

अब्दुल रौफ मर्चंट (मध्यभागी)

मुंबई – ‘टी सीरिज’ चे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी अब्दुल रौफ मर्चंट याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून त्याची शिक्षा कायम ठेवली आहे. अब्दुल रौफ मर्चंट हा दाऊद इब्राहिम याचा साथीदार असून वर्ष २००२ मध्ये गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी  न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती.

अब्दुल रौफ मर्चंट याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्या सततच्या गुन्हेगारी कारवाया आणि गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर त्याने केलेले पलायन यांमुळे शिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची क्षमा मिळण्यास आरोपी पात्र नसल्याचे या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले. १२ ऑगस्ट १९९७ या दिवशी मुंबईतील जुहू, जीतनगर येथील मंदिरातून बाहेर येतांना गुलशन कुमार यांच्यावर ३ जणांनी १६ गोळ्या झाडल्या. यामध्ये गुलशन कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ४०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले असून त्यामध्ये २६ आरोपींची नावे आहेत. यांतील सहआरोपी संगीतकार नदीम अख्तर सैफी हा ब्रिटन येथे स्थायिक झाला आहे. वर्ष २००९ मध्ये आरोपी अब्दुल रौफ मर्चंट याची न्यायालयाने ‘पॅरोल’वर सुटका केली. त्यानंतर तो बांगलादेश येथे पळून गेला. कोणत्याही कागदपत्राविना प्रवेश केल्यामुळे बांगलादेश येथे त्याला अटक करून त्याला ५ वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर पुन्हा वर्ष २०१४ मध्ये आतंकवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून त्याला पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर बांगलादेशाने त्याला भारताकडे सोपवले.