अजित पवारांनी सत्तेचा दुरुपयोग करून जरंडेश्वर साखर कारखाना बळकावला ! – शालिनीताई पाटील, जरंडेश्वर साखर कारखाना, संस्थापक

सातारा, २ जुलै – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग करून जरंडेश्वर साखर कारखाना बळकावला. देवाच्या काठीला आवाज नसतो. १०० अपराध भरले की, फटका बसतोच, अशी प्रतिक्रिया जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केली.

शालीनीताई पाटील म्हणाल्या

१. आमच्या कारखान्याचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी थोडा विलंब झाला होता. केवळ ३ कोटी रुपयांचा हप्ता शिल्लक असतांना कारखाना विकण्यात आला. आमच्या कारखान्याचे जे खाते आहे, त्या खात्यात ८ कोटी ३४ लाख जमा होते. ते पैसे वळवण्यास सांगितले असता दुर्लक्ष करण्यात आले. सरकारची आमच्या कर्जाला हमी होती. त्यामुळे सरकारकडे जाता आले असते; मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही.

२. वर्ष २०१९ मध्ये आण्णा हजारे, माणिकराव जाधव, अरोरा आणि मी अशा ४ जणांनी या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडे आवेदन केले होते. अरोरा यांनी नंतर माघार घेतली. वर्ष २०१९ मध्येच सक्तवसुली संचालनालयाने प्रथमदर्शी अहवाल नोंद केला होता; मात्र काहीच कारवाई न झाल्याने परत दुसरे आवेदन आम्ही दिले. या कारवाईमुळे जरंडेश्वरच्या २७ सहस्र सभासदांना न्याय मिळाला.