नवे-पारगाव (वारणानगर) जिल्हा कोल्हापूर – येथील सनातन संस्थेचे साधक आणि नाक-कान-घसा तज्ञ आधुनिक वैद्य नितीन प्रभाकर कोठावळे (वय ५९ वर्षे) यांचे २९ जून या दिवशी दीर्घ आजाराने दुपारी १२.१५ वाजता त्यांच्या रहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आधुनिक वैद्य कौशल, दोन भाऊ, दोन भावजया, एक पुतण्या आणि एक पुतणी असा परिवार आहे. नवे-पारगाव येथील स्मशानभूमीत दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या शिल्पा कोठावळे यांचे पती, तसेच ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका डॉ. शरदिनी कोरे यांचे जावई होते. आधुनिक वैद्य नितीन हे आमदार आणि वारणा उद्योग समूहाचे श्री. विनय कोरे यांचे मेहुणे होते. सनातन परिवार कोठावळे आणि कोरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
आधुनिक वैद्य नितीन कोठावळे यांची सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती विशेष श्रद्धा होती. नेहमी हसतमुख आणि मनमिळाऊ व्यक्तीमत्त्व असलेल्या आधुनिक वैद्य नितीन यांच्या जाण्याने नवे-पारगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. आधुनिक वैद्य नितीन यांनी सोलापूर शहरात वर्ष १९९८ मध्ये सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवेला प्रारंभ केला. त्यांनी काही काळ सनातन संस्थेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यात्मप्रसाराचे दायित्व पाहिले आहे. सेवाभाव आणि तत्परता ही त्यांची विशेष गुणवैशिष्ट्ये होती. कुणीही अगदी रात्री-अपरात्री साहाय्य मागितल्यास ते त्यांच्या साहाय्यासाठी धावून जात.
वर्ष २००७ पासून आधुनिक वैद्य नितीन कोठावळे हे महात्मा गांधी हॉस्पिटल (नवे-पारगाव, कोल्हापूर जिल्हा) येथे सेवारत होते. ते हिंदु जनजागृती समितीच्या ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून सेवा करत असत. गतवर्षी तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे अध्यक्ष आधुनिक वैद्य सुधाकर कोरे (वय ८१ वर्षे) (आधुनिक वैद्य नितीन कोठावळे यांचे सासरे) यांचे २३ ऑगस्ट २०२० या दिवशी निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ एक वर्ष होण्याच्या आत आधुनिक वैद्य नितीन कोठावळे यांचे निधन झाल्याने तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय, महात्मा गांधी हॉस्पिटल, तसेच नवे-पारगाव परिसरासाठी हा मोठा धक्का आहे.