गर्भवती महिलांनी लसीकरण करावे !

आरोग्य मंत्रालयाकडून गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीविषयी नवीन मार्गदर्शक सूचना जारी

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरक्षित आहे आणि गर्भवती महिलांचे संरक्षण करते. त्यामुळे त्यांनी लसीकरण करावे. कोणत्याही औषधाप्रमाणेच, लसीचे काही दुष्परिणामदेखील होऊ शकतात जे सहसा सौम्य असतात. यात सौम्य ताप, इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी वेदना होते किंवा लसीकरणानंतर १ ते ३ दिवसांपर्यंत अस्वस्थता जाणवते. यासमवेतच लसीकरणानंतरच्या २० दिवसांत अत्यल्प गर्भवती महिलांमध्ये काही लक्षणे दिसू शकतात, ज्यावर त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता असते. जर एखाद्या महिलेस गर्भधारणेच्या वेळी कोरोनाचा संसर्ग झाला असेल, तर प्रसूतीनंतर लगेचच लसीकरण करावे, असे आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

यात पुढे म्हटले आहे की,

१. जर गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्यातील ९० टक्के महिला रुग्णालयात भरती न होता घरीच बर्‍या होतात. तीव्र लक्षणे असलेल्या महिलांना रुग्णालयात भरती करावे लागते. कोरोनामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, ३५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक असते.

२. कोरोनाचा संसर्ग झालेल्या मातांपैकी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणांत नवजात बाळ जन्मतःच चांगल्या स्थितीत असते. काही प्रकरणांमध्ये कोरोना संसर्गामुळे वेळेआधी प्रसूती होण्याचा धोका वाढू शकतो, तसेच मुलाचे वजन २.५ किलोपेक्षा अल्प असू शकते.