आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव आणि आळंदी शहर परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २८ जून ते ४ जुलै पर्यंत संचारबंदी !

पिंपरी-चिंचवड (पुणे), २८ जून – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देहू, आळंदी येथील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव आणि आळंदी शहर अन् आसपासच्या परिसरात २८ जून ते ४ जुलै २०२१ पर्यंत संचारबंदी असणार आहे. या कालावधीमध्ये येथील सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद रहाणार असून या परिसरातील स्थानिक नागरिकाचे ओळखपत्र दाखवून प्रवेश खुला रहाणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या वर्षी बसमधून पालखी पंढरपूला रवाना होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारकर्‍यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर केला आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीच्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण आणि पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल रिंगण वाखरीमध्ये होते. वाखरी ग्रामपंचायतीने यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रतिकात्मक पद्धतींने साजरा करण्याची मागणी केली आहे.