मुंबई – अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स’ पास देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बनावट ओळखपत्र सिद्ध करून लोकलने प्रवास करणार्यांना चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रेल्वे विभागाला याविषयी पत्र लिहिले आहे.
सध्या मध्य रेल्वेतून १८ लाख प्रवासी प्रवास करत आहेत, तर पश्चिम रेल्वेमधून ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. यापैकी ५० टक्के प्रवासी बनावट ओळखपत्राने रेल्वे तिकीट मिळवतात, असा प्रशासनाला संशय आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ घेणे बंधनकारक रहाणार आहे. डेल्टा प्लस व्हायरसचा धोका आणि तिसरी लाट थोपवण्यासाठी लोकलमध्ये गर्दी अल्प करण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे.
अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करतांना ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास’ मिळवण्यासाठी पुढील संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या भ्रमणभाषवरून ‘ओटीपी’ मिळवून विचारलेली माहिती भरावी लागणार आहे.