बनावट औषधांची विक्री केल्याप्रकरणी औषध वितरकास अटक !

नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍यांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे, तसेच ते उत्पादित करीत असलेल्या औषधांवरही बंदी घालायला हवी.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे –  शहर आणि जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना बनावट औषधे विकल्याच्या प्रकरणी सदाशिव पेठेतील औषध वितरकाला विश्रामबाग पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणी औषध निर्मिती करणार्‍या आस्थापनाच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून ‘उमेद फार्मा सेल्स’चे भागीदार प्रभाकर पाटील (रहाणार कल्याणीनगर) यांना कह्यात घेतले आहे. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात ‘मॅक्सरिलीफ हेल्थकेअर आस्थापन’ असून तेथे औषधनिर्मिती करत असल्याचे भासवले होते. याविषयी हिमाचल प्रदेशातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे विचारणा केल्यावर या नावाच्या कोणत्याही अस्थापनाला औषधनिर्मितीचा परवाना दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ‘मॅक्सरिलीफ हेल्थकेअर’ औषध निर्मिती आस्थापनाचे संचालक सुदीप मुखर्जी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांनाही कह्यात घेतले. अन्न आणि औषध विभागाचे निरीक्षक विवेक खेडेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संजय निकुंभ पुढील तपास करत आहेत.