कै. विजय डगवार यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

वर्धा येथील कै. विजय डगवार (वय ६६ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

१४.६.२०२१ या दिवशी विजय डगवार यांचे निधन झाले. २६.६.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

(भाग १)

श्री. विजय डगवार

१. ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी डगवार (पत्नी)

१ अ. यजमान रामनाथी आश्रमात आल्यावर

१ अ १. यजमानांना २ मास रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळणे आणि याविषयी त्यांच्या मनात कृतज्ञतेचा भाव दाटून येणे : ‘यजमानांना २ मास रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. याविषयी त्यांच्या मनात कृतज्ञतेचा भाव दाटून येत होता. मयुरीला (मुलीला) भेटायला रामनाथी आश्रमात यायला मिळाल्याने त्यांना वाटायचे, ‘माझी काही साधना नाही, तरी देव मला आश्रमात बोलावतो.’ त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू यायचे.

१ अ २. आश्रमात रहात असतांनाचे स्वतःचे छायाचित्र भ्रमणभाषच्या ‘डीपी’वर ठेवण्यास मुलाला सांगणे आणि ‘ते छायाचित्र पाहून सर्वांना आनंद मिळेल अन् आश्रमात रहाण्याचे महत्त्वही लक्षात येईल’, असा त्यांचा त्यामागील उद्देश असणे : आश्रमात संतसहवासात रहायला मिळाल्याने यजमानांचा भाव दाटून यायचा. ‘आता मला साधना वाढवायची आहे. देव माझ्याकडून साधना करवून घेईल’, असे ते म्हणत. एकदा ते मुलांना म्हणाले, ‘‘आता माझे वजन वाढले का ? मी चांगला दिसतो का ? माझे छायाचित्र काढ आणि भ्रमणभाषच्या ‘डीपी’वर ठेव. माझे छायाचित्र बघितल्यावर सर्वांना आनंद मिळेल आणि आश्रमात रहाण्याचे महत्त्वही लक्षात येईल.’’ तेव्हापासून त्यांनी त्यांचे छायाचित्र ‘डीपी’वर ठेवले. त्यांचे रामनाथी आश्रमात काढलेले छायाचित्र बघून ते म्हणायचे, ‘‘आधी माझा तोंडवळा रागीट दिसायचा आणि आता चांगला दिसतो. देवाने माझा तोंडवळा चांगला करून दिला.’’

१ आ. साधक घरी निवासाला आल्यावर विचारपूस करून त्यांची काळजी घेणे

एकदा धर्मरथातील साधक निवासाला घरी आले होते. त्या वेळी यजमानांच्या पायाचा त्रास वाढल्याने त्यांना वरच्या मजल्यावर जायला अडचण होती. तेव्हा ते ‘साधकांची व्यवस्था व्यवस्थित केली आहे ना ? काही अडचण आली नाही ना ?’, अशी विचारपूस करत होते. ‘साधकांसाठी गोड पदार्थ बनवून देऊया. ते पुष्कळ प्रवास सतत करत असतात. त्यांची विश्रांती पूर्ण झाली पाहिजे’, असे ते सांगत होते.

१ इ. आजारी असतांना साधकांनी पुष्कळ साहाय्य करणे आणि त्या वेळी ‘सनातन कुटुंब महान असून गुरुदेवांनी सर्वांना किती सुंदर घडवले आहे !’, या विचारांनी यजमानांची भावजागृती होणे

आम्हा दोघांना कोरोना झाला असतांना आमच्यासाठी साधकांकडून जेवणाचा डबा येत असे. तेव्हा ‘साधकांना आपल्यामुळे त्रास होतो’, असे ते म्हणायचे. ‘साधक किती साहाय्य करतात ! सनातन कुटुंब किती महान आहे ! गुरुदेवांनी सर्वांना किती सुंदर घडवले आहे !’, या विचारांनी त्यांची भावजागृती होत असे. घरी आंबे, बिस्किटे इत्यादी पदार्थ आणले की, ‘साधकांना दे’, असे ते म्हणायचे. ‘ती आपली मुलेच आहेत’, असा त्यांचा भाव होता.

१ ई. स्वतःकडून झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना करणे

ते मला म्हणायचे, ‘‘तुम्हाला गुरुकृपेने कधीच काही न्यून पडणार नाही. तुम्ही तुमची साधना चांगली करा. यापुढे माझा कोणताच अडथळा कधीच असणार नाही.’’ ‘माझ्याकडून झालेल्या चुकांविषयी मला क्षमा करा’, असे म्हणून ते क्षमायाचना करायचे.

श्रीमती मंदाकिनी डगवार

१ उ. आश्रमात जाण्याचे नियोजन केलेले असणे; परंतु अडचणींमुळे तिथे जाता न येणे

यजमानांनी ३ आठवड्यांनंतर रामनाथी आश्रमात जाण्याचे नियोजन केले होते; परंतु त्यांना जाता आले नाही. त्याविषयी त्यांना अपराधीपणा जाणवत होता. ‘आपण सर्व साधक, संत आणि गुरुदेव यांच्यासाठी खाऊ घेऊन जाऊ’, असे ते म्हणत होते. तेथील सत्संगाची आठवण येऊन त्यांचा भाव जागृत होत होता.

१ ऊ. निधनापूर्वी

१ ऊ १. इतरांचा विचार करणे

१ ऊ १ अ. रुग्णालयात जातांना ‘आपल्यामुळे इतरांना कोणताच त्रास होऊ नये’, याची काळजी घेणे : १४.६.२०२१ या रात्री १२.०५ वाजता त्यांची पाठ आणि खांदा यांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. ‘तेव्हा ते प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असा धावा करत होते. तीव्र त्रास होत असतांनाही रुग्णालयात भरती होण्यासाठी जातांना समवेत पैसे, आधार कार्ड इत्यादी घेण्याविषयी ते मला सांगत होते. ‘रात्रीची वेळ असल्याने इतरांना कोणताच त्रास होऊ नये’, असे त्यांना वाटत होते.

१ ऊ १ आ. मध्यरात्री ३.३० वाजता बरे वाटल्यावर त्यांनी मला भ्रमणभाष करून ‘काळजी करू नकोस. तू झोप’, असे सांगितले. त्यांनी अनाहतचक्रावर हात ठेवून ‘निर्गुण’ हा नामजप केला.

१ ऊ १ इ. सकाळी ७.३० वाजता त्यांनी मला सांगितले, ‘‘आता मला बरे वाटते. माझ्यासाठी अल्पाहार घेऊन ये.’’ तेव्हा ‘तुला त्रास होणार नाही ना ? काळजी घे’, असे ते मला सांगत होते.

१ ए. मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

१. मी रुग्णालयात पोचले. तेव्हा त्यांना अतीदक्षता विभागात नेले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्या वेळी त्यांचे डोळे उघडे होते आणि हात-पाय थंडगार होते. तेव्हा त्यांचा नामजप चालू असून तोंडवळा शांत आणि समाधानी वाटत होता.

२. त्यांच्यात स्थिरता जाणवत होती आणि ‘ते गुरुचरणांशी शांतपणे झोपले आहेत’, असे मला जाणवत होते.

३. त्यांचा मृतदेह घरी आणल्यावर घरात सर्वत्र दैवी सुगंध येत होता आणि दत्ताचा नामजप आपोआप होत होता.

१ ऐ. अंत्यविधीच्या वेळी

१. दुसर्‍या दिवशी त्यांना स्मशानात नेण्यापूर्वी अंघोळ घालतांना त्यांची त्वचा एकदम मऊ वाटत होती. ‘मी एखाद्या बालकाला अंघोळ घालत आहे आणि ते प्रतिसाद देत आहे’, असे मला वाटत होते.

१ ओ. कार्यालयीन कामांसाठी साहाय्य करणार असल्याचे यजमानांच्या सर्व मित्रांनी सांगणे आणि त्या वेळी गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून भावजागृती होणे

सर्व विधी आटोपल्यावर त्यांचे सर्वच मित्र म्हणत होते, ‘‘आम्ही कार्यालयीन कामांसाठी आपल्याला हवे ते साहाय्य करू.’’ ‘देवच सर्व करतो. गुरुकृपेने सर्व होत आहे. गुरूंनी कुठल्याच गोष्टीची झळही लागू दिली नाही. ते सर्व प्रसंगांत फुलासारखे सांभाळत आहेत. त्यांनी यजमानानांही फुलासारखे अलगद उचलून चरणांशी घेतले’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.

या कालावधीत मला कुठलाही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास झाला नाही. मला गुरूंच्या कृपेचे छत्र अनुभवता आले. ‘पुढेही परात्पर गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण सांभाळणार’, असे वाटून मी पुष्कळ कृतज्ञता अनुभवत होते.’

श्री. अमित डगवार

२. श्री. अमित विजय डगवार (मुलगा)

२ अ. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ १. ‘बाबांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू होते. त्यांना बागकाम, शेती, स्वयंपाक बनवणे, दुरुस्ती काम, विद्युत् जोडणीचे काम इत्यादी सर्व प्रकारची कामे करता येत होती.

२ अ २. प्रेमभाव : व्यक्ती, प्राणी आणि पक्षी यांच्यावर ते निरपेक्षपणे प्रेम करत असत. त्यांनी गायी आणि कुत्रे यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. आमच्या घराजवळ एक गाय आणि कुत्रा नियमित येत असत. ते बाबांनी दिलेले अन्न ग्रहण करत असत.

२ अ ३. पत्नीला सेवा करण्यासाठी सहकार्य करणे : आईला समष्टी प्रसारकार्याची सेवा असल्याने बाबा तिला नेहमी सहकार्य करत असत. आईला बरे वाटत नसल्यास ते घरकाम करत असत, तसेच जेवण बनवून देत असत.

२ अ ४. मित्रांना साधना सांगणे : बाबांचा मित्रपरिवार पुष्कळ मोठा होता. बाबा त्यांच्या मित्रांना सनातन संस्थेने सांगितलेली साधना सांगत असत, तसेच ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून ते मित्रांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या, तसेच आध्यात्मिक ‘पोस्ट’ पाठवत असत.

२ अ ५. त्यांच्यात सूक्ष्मातील कळण्याची क्षमता होती. घर, व्यक्ती आणि वास्तू यांमधील चांगली-वाईट स्पंदने ते जाणू शकत होते.

कु. मयुरी डगवार

२ आ. रामनाथी आश्रमातील २ मासांच्या वास्तव्यात बाबांमध्ये जाणवलेले पालट

२ आ १. सेवा मन लावून आणि परिपूर्ण करणे : बाबा आश्रमात आल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावर तेज जाणवत होते. रामनाथी आश्रमात त्यांना बांधकामाच्या संदर्भातील सेवा मिळाली होती. ‘ती सेवा ते मन लावून आणि परिपूर्णतेने करत होते’, असे मला सहसाधकांकडून कळले. आश्रमामध्ये काही नवीन सुधारणा किंवा पालट करावयाचा असल्यास ते मला सुचवत असत.

२ आ २. बाबांना आश्रमात रहायची सवय नव्हती, तरी त्यांनी आश्रमजीवनाशी लगेच जुळवून घेतले.

२ आ ३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया नियमितपणे राबवणे : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ते नियमितपणे राबवत होते. स्वभावदोष-निर्मूलन सत्संगामध्ये प्रारंभी त्यांना त्यांच्या चुका सांगायला जमत नव्हते; परंतु नंतर त्यांनी ते शिकून घेतले. ते त्यांच्या खिशात एक लहान डायरी ठेवत आणि त्यात ते स्वतःच्या लक्षात आलेल्या चुका लिहून ठेवत. त्यांच्याकडून काही चुका झाल्यास ते स्वतःचे कान धरून क्षमा मागत असत.

२ आ ४. परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे नाव काढल्यावर त्यांची भावजागृती होत असे. त्यांचा संतांप्रती भाव असल्यामुळे शेतात पिकलेले धान्य ते आश्रमात अर्पण करत असत.

२ आ ५. रामनाथी आश्रमात असतांना त्यांच्या पायाचा अस्थिभंग झाला होता, तरीही ते स्वतःची कामे स्वतः करत असत.

२ आ ६. स्वभावदोषांची जाणीव करून दिल्यावर स्वतःला सुधारण्याचा चिकाटीने प्रयत्न करणे : त्यांच्या बोलण्यात कडकपणा असल्याने इतरांना त्यांच्या बोलण्याचा त्रास होत असे. याविषयी त्यांना जाणीव करून दिल्यावर त्यांनी तो स्वभावदोष घालवण्यासाठी चिकाटीने आणि मनापासून प्रयत्न केले. त्यांचा भ्रमणभाष आल्यावर ते आम्हाला विचारत असत, ‘‘माझ्या बोलण्यात काही पालट जाणवतो का ?’’

२ आ ७. ते पहाटे ४ वाजता उठून नियमित नामजपादी उपाय करत असत. ते प्रतिदिन सकाळी व्यष्टी साधनेचा आढावा देत असत.

२ इ. आपत्काळाच्या दृष्टीने योग्य अशी सदनिका खरेदी करण्यास सांगणे : त्यांनी सरकारी नोकरी करत असतांना प्रामाणिकपणे काम करून पैसा मिळवला होता. घराचे काम असो किंवा काही वस्तू खरेदी करायची असो, त्याविषयी अभ्यास करून ‘कुठे काटकसर करता येईल का ?’, हा विचार करून ते निर्णय घेत असत. गोव्याला सदनिका खरेदी करतांना त्यांनी मला विचारून ‘तुला हव्या त्या किमतीची, पाहिजे तशी सदनिका घेऊ शकतो’, असे मला सांगितले. सदनिका खरेदी करतांना त्यांचा दृष्टीकोन हा होता की, अनावश्यक सुविधा (जिम, स्विमिंग पूल, बगीचा इत्यादी) असलेली सदनिका खरेदी करण्याचे टाळून ते पैसे आपण आपत्काळाच्या दृष्टीने वापरू शकतो आणि अर्पण करू शकतो. आपत्काळाच्या दृष्टीने बाबांनी घरी आणि शेतात औषधी वनस्पतींची लागवड केली होती.

(क्रमश:)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक