आम्हाला उत्तेजित केल्यास पुढचा बॉम्ब युद्धनौकांच्या मार्गामध्ये नाही, थेट नौकांवर पाडू ! – रशियाची ब्रिटनला चेतावणी

काळ्या समुद्रातील युद्धनौकांच्या हालचालींचे प्रकरण

मॉस्को (रशिया) – काळ्या समुद्रामध्ये रशियाच्या समुद्र सीमेजवळ ब्रिटीश नौदलाने अधिक हालचाली करून आम्हाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करू नये. त्याने तसे केल्यास आम्ही ब्रिटीश युद्धनौकांच्या मार्गावर नाही, तर थेट युद्धनौकांवर बॉम्ब टाकू, अशी चेतावणी रशियाने ब्रिटनला दिली आहे. रशियाने मॉस्कोमधील ब्रिटीश उच्चायुक्तांना समन्सही पाठवले आहेत. ब्रिटीश युद्धनौकांनी आंतरराष्ट्रीय समुद्री सीमांचे उल्लंघन केल्याचा आरोप रशियाने केला आहे. दुसरीकडे ज्या भागामध्ये ब्रिटीश युद्धनौका होत्या, तो भाग जगातील अनेक देश युक्रेनच्या सागरी सीमेमध्ये असल्याचे समजतात.

‘ब्रिटीश नौकांना चेतावणी देण्यासाठी रशियाच्या नौदलाने कोणतेही बॉम्ब फेकलेले नाहीत’, असे ब्रिटनने स्पष्ट केले आहे. रशियाने काळ्या समुद्रात वावरणार्‍या ब्रिटीश नौदलाच्या युद्धनौकेला तेथून जाण्यासाठी तिच्या मार्गात बॉम्ब फेकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर ब्रिटनने हे स्पष्टीकरण दिले आहे, तर रशियाने ‘नौकांवरच बॉम्ब फेकू’ अशी चेतावणी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

भूमध्य समुद्री भागांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियाला काळा समुद्र महत्त्वाचा वाटतो. या समुद्रावरून रशिया, फ्रान्स, ब्रिटन, तुर्कस्थान आणि अमेरिका यांच्यामध्ये वाद चालू आहे. रशियाने युक्रेनच्या समुद्रकिनार्‍याजवळील क्रिमिया हा भूभाग स्वतःच्या नियंत्रणात घेत तो स्वतःचा प्रदेश असल्याची घोषणा वर्ष २०१४ मध्ये केली होती. तसेच या प्रदेशाच्या आजूबाजूला असणार्‍या समुद्रावरही स्वतःचे नियंत्रण असल्याचेही रशियाने म्हटले आहे; मात्र पाश्‍चिमात्य देशांनी रशियाचा हा दावा फेटाळून लावत क्रिमियाचा भाग हा युक्रेनच्याच मालकीचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच रशिया आणि पाश्‍चिमात्य देश यांंमध्ये वाद चालू आहे.