आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही !

आणीबाणीला ४६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका !

(डावीकडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (उजवीकडे) आणीबाणी घोषित करणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी

नवी देहली – आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. वर्ष १९७५ ते १९७७ या काळात अनेक संस्थांचा योजनाबद्ध पद्धतीने नाश झाला. आपण भारतीय लोकशाहीचा उद्देश यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून केले.

२५ जून १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. या दिवसाला ४६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी हे ट्वीट केले. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात देशात २१ मास आणीबाणी लागू होती.

इन्स्टाग्रामवरील एक लिंक शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी पुढे लिहिले की, काँग्रेसने देशाच्या लोकशाहीतील आचारांना चिरडले. आणीबाणीला विरोध दर्शवणारे आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण करणारे सर्व महान लोक या वेळी आम्हाला आठवतात.