श्रीकृष्णजन्मभूमीवरील मशिदीला मथुरेत दीड पट पर्यायी भूमी देण्याचा हिंदूंचा प्रस्ताव !

श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरण

श्रीकृष्णजन्मभूमीवरील मशिद

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीवरील मशिदीला पर्यायी जागा देण्यास आम्ही सिद्ध आहेत, असा प्रस्ताव याचिकाकर्ते आणि श्रीकृष्ण जन्मभूमीमुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हा न्यायालयात दिला आहे. श्रीरामजन्मभूमीच्या निकालाच्या धर्तीवर त्यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांना अयोध्येत मशिदीसाठी ५ एकर भूमी देण्याचा आदेश सरकारला दिला होता.

१. श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणी येथे खटला चालू आहे. या भूमीवर शाही मशीद आणि मंदिर एकमेकांच्या शेजारी आहेत. हिंदूंनी ‘मशिदीची जागा श्रीकृष्णजन्मभूमीची असून ती त्यांना मिळावी’, यासाठी न्यायालयात यापूर्वीच याचिका प्रविष्ट केली आहे. आता ‘येथील ‘८४ कोस’ परिसराबाहेर आताच्या जागेच्या तुलनेत दीड पट जागा मशिदीला देण्यात यावी. त्यामुळे हे प्रकरण शांततेतच निकाली लागेल’, असे सिंह यांनी नव्या याचिकेमध्ये म्हटले आहे. यावर ५ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.

२. शाही मशिदीचे सचिव आणि अधिवक्ता तनवीर अहमद यांनी यावर म्हटले की, आम्हाला या प्रस्तावाविषयीची कोणतीही प्रत मिळालेली नाही. आम्हाला मिळाल्यावर आम्ही त्यावर बोलू.

भूमी देण्याच्या प्रस्तावाला माझे समर्थन नाही ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणात मशिदीसाठी पर्यायी भूमी देण्याच्या प्रस्तावाचे मी समर्थन करत नाही. जर पर्यायी भूमी दिली गेली, तर याचा अर्थ असा आहे की, मुसलमानांचे श्रीकृष्णजन्मभूमीवरील अवैध नियंत्रण योग्य होते. हा लढा केवळ भूमीसाठी नाही, तर तत्त्वांचा लढा आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणातील एक अधिवक्ता आणि ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे (हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठीच्या आघाडीचे) प्रवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ट्वीट करून व्यक्त केली आहे.