१. साधनेत आल्यानंतर ४ – ५ वर्षांतच नामजप आपोआप आतून होणे
‘मला साधनेत येऊन २२ वर्षे झाली आहेत. मी साधनेत आल्यावर ४ – ५ वर्षांतच माझा नामजप आतून आपोआप होऊ लागला. नामजप आतून होणे, म्हणजे काही प्रयत्न न करता नामजप आपोआप होतो आणि तो नामजप आपण शांतपणे बसून ऐकू शकतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपल्या मनात एक ध्वनीमुद्रित केलेला नामजप लावल्यावर जसे ऐकू येईल, तसे हे असते. हे गुरूंच्या कृपेने होते. माझा आतून २४ घंटे नामजप होत नव्हता. मन रिकामे असतांना किंवा मी मनातून नामजप करायला आरंभ केल्यावर माझा आतून नामजप होत असे.
२. आतून होणारा नामजप बंद पडणे
अनुमाने दीड-दोन मासांपूर्वी माझा आपोआप होणारा नामजप थांबला. त्यामुळे मी घाबरलो. माझ्या मनात विचार येऊ लागले, ‘इतक्या वर्षांपासून होणारा नामजप कोण करत होते ? मी कि अनिष्ट शक्ती ?’ (पाताळातील वाईट शक्ती मंत्र-तंत्र विद्येने आपल्याकडून नामजप करवून घेऊन आपल्याला त्रास देऊ शकतात. – संकलक)
३. नामजप करतांना चांगल्या संवेदना जाणवणे आणि नंतर नामजप मनाशी एकरूप होऊन आनंद मिळणे
काही दिवसांनी नामजपाला बसल्यावर मला चांगल्या संवेदना जाणवू लागल्या. मला त्यामुळे आनंद होत असे. काही वेळानंतर माझा नामजप सावकाश होऊन मधूनमधून थोडा ऐकू येऊ लागला, म्हणजे नामजप माझ्या मनाशी एकरूप होऊन मला आनंद मिळत होता, तसेच माझे मन निर्विचार व्हायचे.
‘माझा नामजप वैखरीतून मध्यमा वाणीत आणि मध्यमा वाणीतून पश्यंती वाणीत होऊ लागला’, असे वाटले.
– डॉ. प्रकाश घाळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.८.२०२०)
|