घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव, अनुभवलेली गुरुकृपा आणि आलेल्या अनुभूती !

१. रुग्णाईत असतांना विविध रुग्णालयांत आलेले कटू अनुभव

श्री. बबन वाळुंज

१ अ. छाती आणि पाठ यांत वेदना होऊ लागल्यावर जवळच्या रुग्णालयात जाणे, ‘इ.सी.जी.’ काढल्यावर तो सामान्य न आल्याने तेथील आधुनिक वैद्य अन् परिचारिका यांनी हाताला धरून ओढत बाहेर आणणे आणि हृदयावर उपचार करणार्‍या रुग्णालयात नेण्यास सांगणे : ‘७.११.२०२० या दिवशी मला माझी छाती आणि पाठ यांत वेदना होऊ लागल्या. तेव्हा ‘रुग्णालयात भरती व्हावे लागेल’, याची मला जाणीव झाली. माझी पत्नी सौ. निर्मला मला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली. त्या वेळी माझी कोरोनाची चाचणी करावी लागणार होती. मला ‘जवळच असलेल्या ‘लॅब’मध्ये रक्त तपासणी करून घ्या’, असे सांगितले. माझी रक्ताची तपासणी केल्यावर आधुनिक वैद्यांनी मला रुग्णालयात भरती करून घेतले. माझा ‘इ.सी.जी.’ काढल्यावर तो सामान्य न आल्याने तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी माझ्या हाताला धरून मला ओढत बाहेर आणले. त्यांनी माझ्या पत्नीला ‘यांना लवकरात लवकर हृदयावर उपचार करणार्‍या रुग्णालयात घेऊन जा. आम्ही तेथे दूरभाष केला आहे’, असे सांगितले.

१ आ. दुसर्‍या रुग्णालयात गेल्यावर उद्वाहक (लिफ्ट) बंद असल्यामुळे २ माळे चढून जावे लागणे आणि तेथे गेल्यावर ‘रुग्णालयात भरती करून घेण्यासाठी आधुनिक वैद्यांना भ्रमणभाष करत आहोत, तोपर्यंत थांबावे लागेल’, असे सांगण्यात येणे : ते रुग्णालय चौथ्या माळ्यावर होते. आम्ही उद्वाहकामध्ये (लिफ्टमध्ये) गेल्यावर ते दुसर्‍या माळ्यावर जाऊन थांबले. माझ्या छातीतील वेदना वाढत होत्या. मला पुढे २ माळे चढून जावे लागले. तेथील कर्मचार्‍यांनी मला रुग्णालयात भरती करून घेण्यास नकार दिला. माझ्या पत्नीने त्यांना काकुळतीने सांगितले. तेव्हा त्यांनी ७०० रुपये घेऊन मला ५ गोळ्या दिल्या आणि ‘भरती करून घेण्यासाठी आम्ही आधुनिक वैद्यांना भ्रमणभाष करत आहोत. तोपर्यंत तुम्हाला थांबावे लागेल’, असे सांगितले.

१ इ. अन्य रुग्णालयात गेल्यावर त्यांनी आधुनिक वैद्य उपस्थित नसल्याने भरती करून घेण्यास नकार देणे : त्याच वेळी एका धर्माभिमान्याने आम्हाला भ्रमणभाष करून खाली बोलावले. (ते धर्माभिमानी सनातन संस्थेला साहाय्य करतात. त्यांचे औषधांचे दुकान आहे.) तेव्हा पत्नीने मला हाताला धरून ४ माळे उतरून खाली आणले. त्या धर्माभिमानी व्यक्तीने आम्हाला त्यांच्या औषधांच्या दुकानासमोर असलेल्या रुग्णालयात जायला सांगितले आणि तेही आमच्या समवेत आले. तेथेही आधुनिक वैद्य उपस्थित नसल्याने त्यांनी भरती करून घेण्यास नकार दिला.

१ ई. रखवालदाराने ‘यांना दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जा’, असे सांगणे आणि ‘त्याच्या माध्यमातून गुरुच आले आहेत’, याची निश्चिती होणे : आम्ही खाली आल्यावर रखवालदाराने सांगितले, ‘‘या आधुनिक वैद्यांच्या नादी लागू नका. आधुनिक वैद्य रुग्णालयातच असतात; परंतु कर्मचारी ‘आधुनिक वैद्य नाही’, असे सांगतात. तुम्ही यांना दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जा.’’ तेव्हा ‘एक सर्वसाधारण मनुष्य देव बनून येतो आणि मार्ग दाखवतो’, असे मला जाणवले. घरातील व्यक्तींनी मला दुसर्‍या रुग्णालयात भरती केले. तेव्हा तेथे एक साधक आले. तेव्हा ‘प्रत्यक्ष गुरुच त्यांच्या रूपात आले आहेत. आता मला मृत्यू आला, तरी देव पुढील प्रवास चांगला करून घेईल’, अशी माझी निश्चिती झाली.

१ उ. दुसर्‍या रुग्णालयात भरती झाल्यावर आलेले वाईट अनुभव

१ उ १. कर्मचार्‍यांनी ‘दीड लाख रुपये आगाऊ (डिपॉझिट) भरा, म्हणजे उपचार चालू करू’, असे सांगणे : दुसर्‍या रुग्णालयात गेल्यानंतर तेथील कर्मचार्‍यांनी ‘दीड लाख रुपये आगाऊ (डिपॉझिट) भरा, म्हणजे उपचार चालू करू’, असे सांगितले. त्यानुसार आम्ही पैसे गोळा करून ते भरले. प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले. ‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्यात ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.

१ उ २. कोरोना चाचणी होईपर्यंत कोरोना रुग्ण विभागात; परंतु कोरोना रुग्णांपासून वेगळे ठेवणे आणि तिसर्‍या दिवशी कोरोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ (नकारात्मक) आल्यानंतर वेगळ्या ठिकाणी ठेवणे : रुग्णालयात भरती केल्यानंतर तेथील आधुनिक वैद्यांनी ‘रुग्णाची कोरोना चाचणी होत नाही, तोपर्यंत त्यांना कोरोना रुग्ण विभागात (वॉर्डमध्ये) ठेवावे लागेल’, असे सांगितले. कोरोना चाचणीचा अहवाल यायला २ दिवस लागतात. प्रथम मला कोरोना ‘वॉर्ड’मध्येच तेथील कोरोना रुग्णांपासून वेगळे ठेवले. माझा मुलगा विजय याने धावपळ करून मला कोरोना रुग्ण नसलेल्या वॉर्डमध्ये ठेवण्याचे प्रयत्न केले. माझी कोरोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ (नकारात्मक) आल्यानंतर तिसर्‍या दिवशी मला कोरोना रुग्ण नसलेल्या ठिकाणी ठेवण्यात आले.

१ उ ३. रुग्णालयातील अक्षम्य दिरंगाई : नंतर २ दिवसांनी आधुनिक वैद्यांनी मला ‘अँजिओग्राफी’चे यंत्र बंद असून ‘ते आज दुरुस्त होईल’, असे सांगितले. ते यंत्र दुसर्‍या दिवशीही दुरुस्त झाले नाही. तेथील आधुनिक वैद्यांना या दिरंगाईविषयी विचारल्यावर त्यांनी आम्हाला ‘केवळ ३ घंटे द्या’, असे सांगितले. या वेळी ‘रुग्णाला पुन्हा छातीत दुखले अन् दगाफटका झाला तर काय ?’, याचा साधा विचारही त्यांच्या मनात आला नाही. केवळ ‘रुग्ण येथून जाऊ नये. देयक वाढत जाईल’, याकडेच त्यांचे लक्ष होते.

१ उ ४. अन्य रुग्णालयात भरती होण्याचे ठरवणे : ‘आधी जे आधुनिक वैद्य माझी ‘अँजिओग्राफी’ करणार होते, त्यांना वैयक्तिक भेटून ते ज्या रुग्णालयात उपचार करतात, तेथे ‘अँजिओग्राफी’ करून घ्यावी’, असे ठरले. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी ‘हे यंत्र अजून २ दिवस दुरुस्त होणार नाही. तेव्हा दुसर्‍या रुग्णालयात आजच भरती व्हा’, असे सांगितले. ‘तेथे वैद्यकीय विम्याची प्रक्रिया संमत होणार नाही’, असे त्यांच्या प्रतिनिधीने (‘मेडिक्लेम एजंट’ने) सांगितल्यावर शेवटी दुसर्‍या रुग्णालयात भरती होण्याचे ठरले. (तेथे या आधुनिक वैद्यांच्या उपचाराचा वार असतो.) अशा प्रकारे आम्ही त्या रुग्णालयातून निघालो. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी अप्रसन्नतेनेच आम्हाला ‘डिस्चार्ज’ दिला. अजून २ दिवस तेथे ठेवले असते, तर २५ ते ३० सहस्र रुपये देयक झाले असते. ‘अँजिओग्राफी’ करणार्‍या आधुनिक वैद्यांनी तेथून ‘डिस्चार्ज’ घेतांना ‘मी सांगितले, असे सांगू नका’, असे सांगितले. शेवटी ‘प्रत्येक आधुनिक वैद्य आपला व्यवसाय आणि प्रतिमा सांभाळतो’, हे लक्षात आले.

२. अनुभवलेली गुरुकृपा

२ अ. ‘रुग्णालयात आधुनिक वैद्यांच्या रूपात परात्पर गुरु डॉ. आठवले येत आहेत’, असे जाणवणे आणि वेदना अन् त्रास दूर होणे : दुसर्‍या रुग्णालयात भरती झाल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता आधुनिक वैद्य आले. त्यांनी मला नमस्कार केला आणि म्हणाले, ‘‘बबनजी, मै विष्णुदास हूं । कैसे हो ?’’ मला हे नाव ऐकून आनंद झाला. त्यांनी दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला. मीही नमस्कार केला. मी म्हणालो, ‘‘अच्छा हूं ।’’ मला ‘जणू गुरुदेवच भेटले’, असे जाणवले. एक घंट्यानंतर दुसरे आधुनिक वैद्य आले. त्यांनी नमस्कार केला. ते म्हणाले, ‘‘घबराव मत । हरि बोलते रहो ।’’ ‘रुग्णालयात आधुनिक वैद्यांच्या रूपात परात्पर गुरु डॉक्टरच येत आहेत’, असे मला जाणवले अणि मला होणार्‍या वेदना, त्रास कुठल्या कुठे पळून गेला. ‘परिचारिका (नर्स), वॉर्डबॉय हे कशी सेवा करतात ?’, हेही शिकायला मिळाले.

२ आ. गुरुदेवांच्या कृपेने साधकांचा सत्संग मिळणे

१. मला दुसर्‍या रुग्णालयातून अन्य एका रुग्णालयात आणले. तेव्हा माझ्यासह श्री. रवि नलावडे हे साधक थांबले होते. त्यांना सेवेविषयी दूरभाष येत होते. तेव्हा ‘देव येथेही सत्संग देत आहे’, याची मला जाणीव झाली.

२. सौ. नयना भगत मला म्हणाल्या, ‘‘काका, तुम्हाला अजून पुष्कळ सेवा करायची आहे. लवकर बरे व्हा. गुरुदेव तुम्हाला सोडणार नाहीत. आपल्याला ईश्वरी राज्य पहायचे आहे.’’ त्यांच्या बोलण्यामुळे मला उभारी आली.

३. रुग्णालयात भरती होण्यासाठी आम्ही अडीच घंटे फिरत होते. त्या वेळीही गुरुदेवांनीच माझे रक्षण केले. पू. संदीप आळशी, सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याकडून मला आधार मिळत होता. त्यांचे बोल मला ऊर्जा पुरवत होते.

४. श्री. दिनेश शिंदे यांनी सांगितले, ‘‘तुम्ही सांगितलेला जप करत रहा. त्याने गुठळ्या विरघळून जातील.’’

२ इ. रुग्णालयाचे देयक संमत होतांना आलेली अडचण दूर होणे : रुग्णालयातून निघतांना ९८ सहस्र रुपये देयक भरायचे होते. त्यातील ५० सहस्र रुपये त्यांनी संमत (पास) केले. उरलेली रक्कम निघण्याच्या (‘डिस्चार्ज’च्या) वेळी संमत (पास) करणार होते; पण रात्री १0 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही; कारण विमा आस्थापनाकडून उरलेल्या पैशांविषयीची संमती आली नाही. त्यामुळे ते मला सोडत नव्हते. शेवटी माझ्या मुलीने ‘पोलिसांत तक्रार करतो’, असे ठामपणे सांगितल्यावर लगेच देयक संमत झाल्याचा अहवाल आला. ते ३ – ४ घंटे टोलवाटोलवीची उत्तरे देत होते. गुरुदेवांनी प्रत्येक अडचणीतून आम्हाला बाहेर काढले.

३. अनुभूती

३ अ. ‘अँजिओग्राफी’ करण्याचे यंत्र बंद असल्याचे कळल्यावर देवाच्या कृपेने सकारात्मक रहाता येणे, संतांनी सांगितलेला जप केल्यावर त्याचा चांगला लाभ होणे आणि आधुनिक वैद्यांनी प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचे सांगणे : ‘अँजिओग्राफी’ करण्याचे यंत्र बंद असल्याचे कळल्यावर देवाने मला या परिस्थितीतही सकारात्मक ठेवले. ‘ही वेळ म्हणजे मला देवाने नामजप करायला दिलेली संधी आहे’, हे माझ्या लक्षात आले. संतांनी मला ‘महाशून्य’ हा जप करायला सांगितला होता. मला या जपाचा चांगला लाभही झाला. ‘घरातील २ – ३ व्यक्ती माझ्या हृदयातील रक्ताच्या गुठळ्या नष्ट व्हाव्यात’, यासाठी सातत्याने जप करत होते. ‘जपामुळे छातीत असलेल्या गाठी वितळून जातील’, असे सांगितले होते आणि तसेच झाले. रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि परिचारिका ‘माझ्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे’, असे सांगत होते. ‘वैद्यकीय उपायांसह संतांचा संकल्प आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय असतील, तरच परिपूर्ण उपचार होऊन रुग्ण लवकर बरा होतो’, हे लक्षात आले. माझी ‘अँजिओग्राफी’ झाल्यावर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘ठीक आहे. पथ्य पाळा. व्यवस्थित होईल.’’

३ आ. रुग्णालयाच्या सामान्य विभागात असतांना आलेल्या अनुभूती

३ आ १. रुग्णालयाच्या सामान्य विभागात (जनरल वॉर्डमध्ये) आणल्यावर बाजूच्या गृहस्थाच्या मुलीने मीराबाईंची भजने ऐकवणे आणि त्यामुळे मनाला शांती मिळणे : ९.११.२०२० या दिवशी मला रुग्णालयाच्या सामान्य विभागात (‘जनरल वॉर्ड’मध्ये) आणले. तेथेही खाट उपलब्ध नव्हती. बाजूला एक खोली होती. तेथे ८३ वर्षांचे गुजराथी गृहस्थ होते. मला त्यांच्या बाजूला ठेवले होते. मला त्यांच्याकडे पाहून चांगले वाटले. काही वेळाने त्यांच्या मुलांनी माझी विचारपूस केली. त्या गृहस्थाच्या मुलीने वडिलांना संत मीराबाईंची भजने ऐकवली. ३ घंटे भजने चालू होती. तेव्हा माझ्या मनाला शांती मिळाली.

३ आ २. कुंकवाचा सुगंध येऊन श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीच्या रूपात दिसणे आणि भावजागृती होणे : ही शांती अनुभवत असतांना मला कुंकवाचा सुगंध आला आणि समोर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीच्या रूपात दिसल्या. त्यांच्या एका हातात चक्र होते आणि दुसरा हात आशीर्वाद देणारा होता. ‘आशीर्वाद देणार्‍या हातातून येणारे चैतन्य सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले. तेव्हा माझे दोन्ही हात आपोआप जोडले गेले आणि माझी भावजागृती झाली. ‘गुरुदेव आपल्या साधकाला स्थुलातून आणि सूक्ष्मातून सांभाळतात अन् त्याचे रक्षण करतात’, याची मला प्रचीती आली. ‘तीव्र प्रारब्ध असलेल्या आपल्या साधकाला महामृत्यूयोगातून परात्पर गुरु डॉक्टरांनी बाहेर काढले’, असे मला जाणवले. वर्ष २००१ मध्ये माझा अपघात झाला होता. त्यातून मला परात्पर गुरु डॉक्टरांनीच मृत्यूच्या दाढेतून परत आणले. माझ्या कुटुंबातील आजी, वडील, आई, बहीण, भाऊ आणि पुतण्या यांना अपघाती मृत्यू आले आहेत. मी गुरुदेवांच्याच कृपेने वाचलो आहे.

४. वरील प्रसंगातून ‘शरीर स्वास्थ्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे’, हे शिकायला मिळणे

मला हृदयात दुखण्याअगोदर ‘छातीत दुखणे, घाम येणे, पाठ दुखणे’, अशा प्रकारची लक्षणे जाणवत होती. ‘तुम्ही आधुनिक वैद्यांकडे जा’, असे घरातील व्यक्तींनी सांगूनही ‘मला पित्तामुळे त्रास होत असावा’, असा मी स्वतःच निष्कर्ष काढला आणि आधुनिक वैद्यांकडे जाणे टाळले. एकदा मला अकस्मात् अस्वस्थ वाटू लागल्यानंतर मी आधुनिक वैद्यांकडे धाव घेतली. त्यामुळे मला अन् माझ्या कुटुंबियांना पुष्कळ त्रास झाला, तसेच हृदयात वेदना अधिक होत असल्यामुळे आधुनिक वैद्य मला रुग्णालयात भरती करून घेण्यास टाळाटाळ करू लागले. त्यामुळे ईश्वर आणि गुरु यांना मला वाचवण्यासाठी शक्ती व्यय करावी लागली. यात ‘इतरांचे न ऐकणे, स्वतःच्या मनाने करणे आणि गांभीर्याचा अभाव’, हे स्वभावदोष माझ्या लक्षात आले अन् ‘शरीर स्वास्थ्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे’, हे मला शिकायला मिळाले.’

– श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे), घाटकोपर, मुंबई. (२८.१२.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक