पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचखोर साहाय्यक भूसंपादन अधिकारी आणि अव्वल कारकून कह्यात !

ठाणे, २३ जून (वार्ता.) – तक्रारदारांचे घर विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणात संपादित केले असून त्याचा मोबदला म्हणून ६ लाख ३६ सहस्र रुपये संमत झाले आहेत. ही रक्कम मिळवून दिली; म्हणून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील साहाय्यक भूसंपादन अधिकारी अंकुश पुरुषोत्तम पाटील आणि अव्वल कारकून वर्षा मनोहर पानझडे पाटील यांनी १५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ती रक्कम पालघर रेल्वे स्थानक परिसरात तक्रारदाराकडून घेतांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंकुश पाटील यांना, तर रक्कम घेण्यास प्रोत्साहन देणार्‍या वर्षा पानझडे पाटील यांना कह्यात घेतले आहे. (लाचखोरांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच त्यांना कायद्याचे भय वाटत नाही. लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी. – संपादक)