१. यज्ञाच्या वेळी प्रार्थना केल्यानंतर पांढर्या रंगाची आणि लाल काठाची साडी परिधान केलेल्या श्री शांतादुर्गादेवीचे (कुलदेवतेचे) दर्शन होऊन मोगर्याचा सुगंध येणे : ‘नवरात्र चालू असतांना बेंगळुरूहून येतांना मी यज्ञासाठी मोगर्याची पुष्कळ फुले आणली होती. तेव्हा श्री. विनायक शानभाग म्हणाले, ‘‘भरपूर फुले मिळाली. आपल्याला दोन दिवस पुरतील.’’ सप्तमीच्या दिवशी ‘देवी यज्ञा’च्या वेळी, ‘मला आज देवीचे दर्शन होऊ दे’, अशी प्रार्थना होत होती. मी जेव्हा प्रार्थना केली, तेव्हा मला माझी कुलदेवता श्री शांतादुर्गादेवीचे दर्शन झाले. तिने पांढर्या रंगाची आणि लाल काठ असलेली साडी परिधान केली होती. तिच्या पुढे मोगर्याची पुष्कळ फुले होती, तसेच मला मोगर्याचा सुगंधही येत होता.
२. यज्ञात अत्तर अर्पण करताच यज्ञस्थळी साक्षात् देवी प्रकट होणे : मला देवीचे दर्शन झाले, त्या वेळी ‘आपण आता मोगर्याचे अत्तर यज्ञात अर्पण करत आहोत’, असे विनायकदादांनी सांगितले. त्याच वेळी ‘यज्ञस्थळी साक्षात् देवी प्रकट झाली आहे’, असे माझ्या लक्षात आले.
३. देवीने स्वतःच्या डोक्यावरचा मुकुट साधिकेच्या डोक्यावर ठेवून तिला ‘चांगली साधना कर’, असे सांगणे आणि तेव्हापासून ‘देवी सतत समवेत आहे’, असे वाटणे : यज्ञस्थळी प्रकट होऊन देवी माझ्या जवळ आली. तिने तिच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर ठेवला आणि मला म्हणाली, ‘चांगली साधना कर. सतत माझ्याशी बोलत रहा, सांगत रहा, विचारत रहा.’ त्या दिवसापासून ‘देवी सतत माझ्या समवेत आहे’, असे वाटू लागले. अजूनही ते दृश्य डोळ्यांसमोर सतत दिसते. ‘श्रीगुरूंच्या चरणी शरण जाऊन त्यांनी सांगितलेले साधनेचे प्रयत्न नियमित कर’, हेच श्री शांतादुर्गादेवीने मला सांगितले. ही अनुभूती दिल्याविषयी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती पूर्णिमा प्रभु, बेंगळुरू
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |