आयुर्वेदाच्या औषधांद्वारे ७ दिवसांत कोरोनाचे रुग्ण बरे होतात ! – संशोधनाचा निष्कर्ष

 ‘आयुष-६४’ औषधाचा चांगला परिणाम होत आहे !

नवी देहली – कोरोनाच्या संसर्गावर आयुर्वेदाची औषधे घेतली, तर ७ दिवसांत कोरोनामुक्त होता येते, अशा प्रकारचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे.

१. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या संचालक डॉ. तनुजा नेसरी यांनी सांगितले की, आयुर्वेदामध्ये अशी अनेक औषधे आहेत, जी चवीला कडू असली, तरी कोरोनावरील उपचारासाठी परिणामकारक सिद्ध झाली आहेत. तुळस, गुळवेल, अश्‍वगंधा, कडूलिंब  आदी औषधे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. तसेच यांत असणारे विषाणूविरोधी गुण संसर्गाला न्यूनही करतात. याच औषधांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या काळात ‘आयुष-६४’ हे आयुर्वेदाचे औषध बनवले आणि त्याचे परिणाम अत्यंत चांगले दिसत आहेत.

२. सी.सी.आर्.ए.एस्. (सेंट्रल काऊंसिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स म्हणजे आयुर्वेदशास्त्राच्या संशोधनाची केंद्रीय परिषद) या संस्थेचे संचालक डॉ. एन्. श्रीकांत यांनी सांगितले की, आयुष मंत्रालयाने गेल्या वर्षभरात आयुर्वेदाच्या औषधांवर बरेच संशोधन केले आहे. त्यासाठी ‘आयुष रिसर्च अँड डेव्हलपमेंट टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने केलेल्या तपासणीसमध्ये ‘आयुष-६४’ या औषधामुळे कोरोनाची प्राथमिक लक्षणे असणार्‍यांवर चांगले परिणाम होत असल्याचे आढळून आले. या औषधामुळे प्राथमिक लक्षणे असणारे रुग्ण ७ दिवसांत बरे झाले. या संदर्भात आतापर्यंत १२२ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये आयुष-६४ चा चांगल्या प्रकारे लाभ झाल्याचे दिसून आले आहे.