ओरोस येथे ५० खाटांच्या ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’चे लोकार्पण
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – एका मोठ्या संकटाचा सामान आपण सर्वजण करत आहोत. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येत आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून यावर मात करू शकतो आणि कोरोनाला हद्दपार होऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
येथील जिल्हा समादेशक कार्यालयाच्या इमारतीमध्ये कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या निधीतून ५० खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’ निर्माण करण्यात आले आहे. याचे लोकार्पण खासदार पवार यांच्या हस्ते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक खासदार आणि आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात आले.
या वेळी खासदार पवार पुढे म्हणाले, ‘‘१ जूनला राज्य सरकारकडे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’चा प्रस्ताव आला आणि आज त्याचे लोकार्पण होत आहे. यातून प्रशासनाची गतीमानता दिसून येते. राज्यावर ज्या ज्या वेळी संकटे आली, त्या त्या वेळी ती परतवून लावण्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न केले आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, ऑक्सिजन उत्पादक घटक, शासन, प्रशासन, असे सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आपल्या सर्वांच्या अशा सामुदायिक प्रयत्नाने कोरोनाचे हे संकटदेखील गेल्याशिवाय रहाणार नाही.’’