‘वर्ष २०१२ पासून जानेवारी २०२० च्या तिसर्या आठवड्यापर्यंत मी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत होते. काही कारणांमुळे जानेवारी २०२० च्या शेवटच्या आठवड्यात मला घरी जावे लागले. घरी रहात असतांना देवाने माझ्याकडून करवून घेतलेले प्रयत्न, रामनाथी आश्रमात परत येण्याच्या संदर्भातील देवाचे नियोजन अन् आश्रमात आल्यावर मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. घरी असतांना केलेले साधनेचे प्रयत्न
१ अ. घरी गेल्यावर ‘भगवान श्रीकृष्ण क्षणोक्षणी माझ्या समवेत आहे’, असा भाव ठेवून घरातील कामे करणे आणि एका संतांचे कपडे शिवण्याची सेवा मिळाल्यामुळे ती करण्यात मन रमणे : रामनाथी आश्रमात असतांना मला जास्त साधकांच्या समवेत रहायची सवय होती. घरी गेल्यावर दिवसभर मी एकटी असायचे. त्यामुळे आरंभी मला घरी करमत नव्हते. त्या वेळी मी ‘भगवान श्रीकृष्ण क्षणोक्षणी माझ्या समवेत आहे’, असा भाव ठेवू लागले. मी घरी एकटीच असल्याने श्रीकृष्णाशी बोलून आणि त्याला सांगून घरातील कामे करायचे. मला एका संतांचे कपडे शिवण्याची सेवा मिळाली होती. ती सेवा करतांना माझे मन त्यात रमायचे. त्यामुळे मला एकटेपणा वाटला नाही.
१ आ. मनात नकारात्मक विचार आल्यावर निर्जीव वस्तूंशी बोलणे : घरी असतांना माझ्या मनात नकारात्मक विचार किंवा निराशा आल्यावर मला कुणाशी बोलायला मिळत नसे. तेव्हा मी घरातील निर्जीव वस्तूंशी बोलत असे, उदा. शिवण यंत्र, भिंत. मी त्यांना म्हणायचे, ‘तुम्ही आहे त्या स्थितीत आनंदी आहात. तुम्हाला कसली अपेक्षा नाही. त्यामुळे तुम्हाला दुःखही नाही.’
१ इ. रडू आल्यावर आरशात पहाणे, आरशातील स्वतःच्या प्रतिबिंबाला ‘पार्वती, तुझा रडवेला तोंडवळा परात्पर गुरुदेवांना आवडेल का ?’, असे विचारून परात्पर गुरुदेवांसाठी हसण्याचा प्रयत्न करणे, त्यानंतर रडणे बंद होणे आणि निराशेतून बाहेर पडणे : मला कधी रडू आले की, मी आरशात स्वतःचा तोंडवळा बघायचे. मला आरशात स्वतःचा रडवेला तोंडवळा पहाता येत नसे. त्यात दिसणार्या प्रतिबिंबाला मी म्हणत असे, ‘पार्वती, तुझा असा रडवेला तोंडवळा तुलाच बघावासा वाटत नाही, तर परात्पर गुरुदेवांना आवडेल का ? त्यांना तू आनंदी असलेली आवडतेस.’ त्यानंतर मी परात्पर गुरुदेवांसाठी हसण्याचा प्रयत्न करायचे आणि हसरा तोंडवळा पाहून मलाच चांगले वाटायचे. असे करता करता माझे रडणे बंद व्हायचे आणि मी निराशेतून बाहेर पडायचे.
१ ई. आश्रमाप्रमाणे घरातील प्रलंबित सेवांची सूची करणे आणि त्याप्रमाणे सेवा करतांना आनंद मिळणे : एकदा रामनाथी आश्रमातील एका साधिकेने मला सांगितले, ‘‘आम्हाला उत्तरदायी साधकांनी शिवणाच्या संदर्भातील प्रलंबित सेवांची सूची काढण्यास सांगितले आहे.’’ तेव्हा मी ‘देवाने हे सूत्र माझ्यापर्यंत पोचवले आहे. गुरूंना माझ्याकडूनही असे प्रयत्न करणे अपेक्षित आहे’, असा विचार केला आणि मी घरातील प्रलंबित सेवांची सूची केली. ती सूची करतांना आश्रमात ज्याप्रमाणे सेवांची विभागणी करतात, तशी विभागणी केली, उदा. स्वयंपाक, शिवण, बांधकाम, लिखाणाची सेवा. त्याप्रमाणे घरातील सेवा करतांनाही मला आनंद मिळाला.
१ उ. आई, बहीण आणि आजी आजारी असतांना त्यांची सेवा करणे अन् ‘देवाने आपत्काळापूर्वी त्यांच्याशी असलेला देवाणघेवाण हिशोब पूर्ण केला’, असे जाणवणे : माझी आई आणि बहीण, अशा दोघी रुग्णाईत होत्या. त्यामुळे काही दिवस त्या माझ्या घरी विश्रांतीसाठी आल्या होत्या. त्या वेळी मी ‘दोघींना रुग्णालयात नेणे आणि त्यांना साहाय्य करणे’, अशा सेवा करत होते. आईला थोडे बरे वाटल्यावर मी तिला तिच्या घरी सोडले आणि तेथून परत येतांना आजी (आईची आई) माझ्या समवेत माझ्या घरी आली. त्यानंतर थोड्या दिवसांनी तिला पक्षाघाताचा झटका (पॅरॅलिसिसचा ॲटॅक) आला. मी तिला लगेचच रुग्णालयात भरती केले. त्या दिवशी मी एकटीच तिच्या समवेत रुग्णालयात राहिले. त्या वेळी मी एकटीनेच तिची सेवा केली. तिला आधार देऊन रुग्णालयात घेऊन जातांना ‘देव मला शक्ती देत आहे’, असे मला जाणवत होते आणि आतूनच ‘तिला कसे साहाय्य करायचे ?’, हे मला सुचत होते. त्या वेळी तिचे बोलणेही इतरांना समजत नव्हते. तिचे वय ८० वर्षांपेक्षाही अधिक असूनही ‘तिला काहीतरी होईल’, अशी भीती मला वाटली नाही. दुसर्या दिवशी मला साहाय्य करण्यासाठी माझी मामी आली. आम्ही दोघी ५ दिवस रुग्णालयात राहिलो. आजीचे वय अधिक असूनही ती बरी झाली. ती चालायला लागली आणि स्पष्ट बोलू लागली. ‘माझी आजी बरी झाली’, ही माझ्यावरची देवाची कृपा आहे.
या प्रसंगात मला वाटले, ‘देवाने आपत्काळापूर्वी आई, बहीण आणि आजी यांच्याशी असलेला माझा देवाणघेवाण हिशोब या प्रसंगांच्या माध्यमातून पूर्ण केला.’
१ ऊ. साधकांच्या विवाह सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळणे आणि तेथे सेवाभावाने सेवा केल्याने धर्मजागृती सभेची सेवा करतांना जसा आनंद मिळतो, तसा आनंद मिळणे
१ ऊ १. आश्रमात असतांना ‘विवाह सोहळ्यातील सेवा शिकून घ्याव्यात’, असे वाटणे; पण इतर सेवांमुळे या सेवा करता न येणे आणि घरी असतांना साधकांचा विवाह ठरल्यावर त्यांच्या साखरपुड्यापासून लग्नापर्यंतची सर्व कामे सेवा म्हणून करणे : आश्रमात असतांना मला वाटायचे, ‘सर्व सेवांतील बारकावे शिकून घ्यायला पाहिजेत.’ घरी गेल्यावर सर्वच सेवा माझ्याकडे आल्या. अशा प्रकारे देवाने माझी छोटीशी इच्छाही पूर्ण केली. आश्रमात होणार्या ‘विवाह सोहळ्याच्या वेळी रांगोळी काढणे, व्यासपीठ फुलांनी सजवणे, वधूला सजवणे’, अशा सेवा शिकून घ्याव्यात’, असे मला वाटायचे; पण इतर सेवा असल्यामुळे मला या सेवा करता आल्या नाहीत. मी घरी असतांना सनातनचे साधक श्री. उदयकुमार आणि साधिका चि.सौ.कां. प्रेमा गौडा यांचा विवाह ठरला. तेव्हा त्यांच्या साखरपुड्यापासून लग्नापर्यंतची सर्व कामे मी सेवा म्हणून केली.
१ ऊ २. वधूला नऊवारी साडी नेसवण्याची सेवा मिळणे, गुरुदेवांना प्रार्थना करून सेवाभावाने ही सेवा करणे आणि त्यामुळे प्रथमच साडी नेसवत असूनही वधूला व्यवस्थित साडी नेसवता येणे : उदयदादा आणि प्रेमा यांचा विवाह शास्त्राप्रमाणे करण्याचे ठरले. शास्त्राप्रमाणे वधूला विवाहाच्या वेळी नऊवारी साडी नेसवतात. आमच्या गावात कुणालाही नऊवारी नेसता येत नाही. त्यामुळे वधूला नऊवारी साडी नेसवण्यासाठी माझेच नियोजन झाले. मी रामनाथी आश्रमात असतांना एकदा नऊवारी साडी नेसायला शिकले होते आणि ती नेसण्याचा सराव व्हावा; म्हणून मी सणांच्या दिवशी थोडा वेळ नऊवारी साडी नेसायचे. मी प्रेमाताईच्या लग्नाच्या आधी दोन वेळा स्वतः नऊवारी साडी नेसून सराव केला आणि लग्नाच्या दिवशी गुरुदेवांना प्रार्थना करून सेवाभावाने वधूला साडी नेसवली. विशेष म्हणजे मी प्रथमच साडी नेसवत असूनही तिला व्यवस्थित साडी नेसवता आली.
१ ऊ ३. वधूची सिद्धता करतांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे अन् त्यामुळे ती सेवा अल्प कालावधीत पूर्ण होणे : कु. प्रेमा हिच्यात भाव आहे. त्यामुळे तिची सर्व सिद्धता करण्याची सेवा माझ्याकडून सेवाभावाने होत होती. सिद्धता करतांना आम्ही दोघी प्रार्थना करायचो आणि कृतज्ञता व्यक्त करायचो. त्यामुळे विवाहाच्या दिवशीही तिची सिद्धता अल्प कालावधीत झाली. एरव्ही वधूची सिद्धता करण्यासाठी अधिक वेळ लागतो; पण प्रेमाताईची सिद्धता करण्यासाठी अल्प कालावधी लागल्याने पुरोहितांनाही आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, ‘‘इतर लग्नांमध्ये वधूची सिद्धता करण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो; पण तुम्ही फार अल्प वेळेत तिची सिद्धता केलीत !’’
१ ऊ ४. विवाह सोहळ्यात साधकांनी केलेली सेवा पाहून वराच्या नातेवाइकांनी साधकांचे कौतुक करणे आणि ‘केवळ गुरूंच्या शिकवणीमुळे साधकांमध्ये कुटुंबभावना आहे’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटणे : उदयदादांच्या घरातील सर्व जण मला हक्काने सर्वकाही सांगायचे. लग्नाच्या वेळी मी करत असलेली सेवा पाहून लग्नाला आलेले लोकही उदयदादाच्या कुटुंबियांना ‘ही कोण आहे ?’, असे विचारायचे. तेव्हा ते ‘ही सनातनची साधिका आहे’, असे सांगायचे. सनातनच्या इतर काही साधकांनीही लग्नातील बर्याच सेवा केल्या. ते पाहून उदयदादाचे नातेवाइक म्हणाले, ‘‘जवळचे कुणीही इतके करू शकत नाही. सनातनमधील कुटुंबभावना छान आहे.’’ हे कौतुक ऐकल्यावर मला वाटले, ‘आपले गुरु किती महान आहेत ! त्यांची शिकवण किती महान आहे !’ ‘केवळ आणि केवळ गुरूंच्या शिकवणीमुळे आपण कुटुंबाप्रमाणे राहू शकतो’, याची जाणीव होऊन मला कृतज्ञता वाटत होती.
विवाहाच्या संदर्भातील सेवा करतांना धर्मजागृती सभेची सेवा करतांना जसा आनंद मिळतो, तसा आनंद मला मिळाला. ‘हा मायेतील कार्यक्रम आहे’, असे मला वाटत नव्हते. ‘सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव विवाहाला आले आहेत’, असे मला जाणवत होते.
२. पूर्वी आश्रमात असतांना परात्पर गुरुदेवांच्या संदर्भातील केलेल्या सेवांचा विचार मनात येणे, त्या संदर्भात यजमानांशी बोलतांना त्यांनी काही दिवस रामनाथी आश्रमात जाण्यास सांगणे अन् एका घंट्याने रामनाथी आश्रमात येण्याच्या संदर्भात साधिकेचा भ्रमणभाष येणे
एकदा माझ्या मनात विचार येत होते, ‘आतापर्यंत परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी त्यांनी परिधान करायचे कपडे शिवण्याची महाभाग्याची सेवा मला काही वेळा मिळाली होती. मी त्यांच्या संदर्भातील इतरही काही सेवा केल्या आहेत; पण त्यातील काही सेवा परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशा परिपूर्ण करता आल्या नाहीत.’ या विचारांनी मला निराशा आली. याविषयी मी माझ्या यजमानांशी मनमोकळेपणाने बोलले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तुला रामनाथीची पुष्कळ आठवण येत असेल, तर तू काही दिवसांसाठी रामनाथीला जा. तेथे थोडे दिवस राहून आल्यावर तुला बरे वाटेल.’’ असे आमचे बोलणे झाल्यावर एक घंट्याने रामनाथी आश्रमातून एका साधिकेचा मला भ्रमणभाष आला. ती मला म्हणाली, ‘‘शिवणाच्या संदर्भातील सेवेसाठी तू रामनाथी आश्रमात येऊ शकतेस का ?’’ तेव्हा मी लगेच ‘हो’ म्हणाले. त्यावर ती म्हणाली, ‘‘तू घरच्यांशी बोलून नंतर कळवले, तरी चालेल.’’ तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘आमचे आताच बोलणे झाले आहे आणि यजमानांनी मला रामनाथी जाण्यासाठी होकार दिला आहे.’’ यावरून मला वाटले, ‘हे सर्व देवाचेच नियोजन आहे; कारण मी रामनाथीला जाण्याच्या संदर्भात देवाने माझी आणि यजमानांची मनाची सिद्धता आधीच केली होती. त्यामुळे साधिकेचाही त्या संदर्भातील समन्वय करण्यात वेळ वाचला.’
३. रामनाथी आश्रमात आल्यावर सर्व सेवा आपोआप होत असल्याचे जाणवणे आणि ‘गुरुदेवच सर्व करवून घेत आहेत’, याची अनुभूती येणे
रामनाथी आश्रमात येतांना मला वाटत होते, ‘घरी असतांना मी काही दिवस व्यष्टी साधना नीट केली नाही. त्यामुळे माझ्यावर अनिष्ट शक्तींचे आवरण आले असेल. आश्रमातील चैतन्य मला सहन होणार नाही.’ रामनाथीला आल्यानंतर माझी सेवा चालू झाली. तेव्हापासून मला १० – १२ दिवस सेवा होती. काही वेळा मी रात्री जागरण केले. घरी असतांना मला अधिक वेळ झोपण्याची सवय होती. असे असतांनाही ‘मला दिलेली सेवा कशी पूर्ण झाली ?’, हे मला कळलेही नाही. एरव्ही सेवा करतांना माझ्या मनात सेवांचे किंवा त्या संदर्भातील नियोजनाचे विचार तरी असायचे; पण या वेळी सगळे आपोआप होत गेले. ‘मी एका कठपुतलीप्रमाणे आहे आणि एका वेगळ्या दैवी ऊर्जेनेच सर्व होत आहे’, असे मला वाटत होते. ‘गुरुदेवच माझ्याकडून सर्व करवून घेत आहेत’, याची अनुभूती मी क्षणोक्षणी घेतली. या सर्व स्थितीत मला पुष्कळ आनंद मिळाला.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
आश्रमात आल्यावर काही संत आणि साधक मला म्हणाले, ‘‘तू घरून आली आहेस, तरी तू आनंदी दिसतेस.’’ हे ऐकल्यावर ‘देवाने माझ्याकडून वरील प्रयत्न करवून घेतले आहेत’, याची मला जाणीव झाली.
‘हे गुरुदेवा, ‘या अज्ञानी जिवाकडून तुम्हीच साधनेतील प्रयत्न करवून घेत आहात, तरी मला त्याची जाणीव होत नाही. संत आणि साधक यांच्या माध्यमातून तुम्ही मला त्याची जाणीव करून देत आहात’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित असे साधनेतील प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
सौ. पार्वती जनार्दन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२१)
सौ. पार्वती जनार्दन यांचे संतांनी केलेले कौतुक !१. ‘पार्वतीच्या मनात सतत साधनेचेच विचार असल्याने मायेत राहूनही ती पूर्णवेळ साधनेत आहे’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे ‘सौ. पार्वती जनार्दन घरून रामनाथी आश्रमात आली. त्यानंतर एकदा आम्ही दोघी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे एका सेवेसाठी गेलो होतो. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई मला म्हणाल्या, ‘‘पार्वती एवढे दिवस घरी होती, तरी तिच्याकडे पाहून छान वाटते. एरव्ही व्यक्ती घरी गेल्यावर मायेत अडकते; पण हिच्याकडे पाहून तसे जाणवत नाही. मायेत राहूनही ती अलिप्त आहे; कारण तिच्या मनात सतत साधनेचेच विचार असतात. त्यामुळे तिच्या तोंडवळ्यावर साधनेचा आनंद दिसत आहे. मायेत राहूनही ती पूर्णवेळ साधनेत आहे. ‘पार्वतीशी बोलत रहावे आणि तिचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते. तिच्याशी बोलतांना ‘वेळ कसा जातो ?’, हे कळत नाही. पूर्वी रामनाथीला असतांनाही जेव्हा ती मला भेटायला यायची, तेव्हाही असे व्हायचे. ती घरी गेल्यावर मला तिची पुष्कळ आठवण यायची. ‘अनेक वेळा पार्वती असती, तर बरे झाले असते’, असे मला वाटायचे. माझी तशी साधकांशी चर्चाही व्हायची. ‘सेवा आहे; म्हणून ती रामनाथीला असायला पाहिजे’, असे नाही; पण तिची आठवण यायची. तिचे पतीही पुष्कळ चांगले आहेत. त्यांनीही पार्वतीला मायेत अडकू दिले नाही.’’ २. ‘आश्रमात अनेक वर्षे पूर्णवेळ सेवा केल्यानंतरही घरी गेल्यावर तेवढीच; किंबहुना त्यापेक्षा अधिक आनंदी असणारी पार्वती ही पहिलीच साधिका असेल’, असे एक संतांनी सांगणे एकदा मी आणि सौ. पार्वती एका संतांकडे गेलो होतो. त्या वेळी त्यांनी तिचे पुष्कळ कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘पार्वती किती हसतमुख आहे ! ती किती आनंदी दिसते ! घरी राहूनही ती पुष्कळ आनंदी आहे. आश्रमात अनेक वर्षे पूर्णवेळ सेवा केल्यानंतरही घरी गेल्यावर तेवढीच; किंबहुना त्यापेक्षा अधिक आनंदी असणारी अशी पहिलीच साधिका असेल. सनातनच्या सर्व साधिकांमध्ये सासरी राहूनही आनंदी असणारी ही पहिलीच साधिका असेल.’’ हे ऐकून पार्वती लाजली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘पार्वती किती छान लाजते ! हिच्यात पुष्कळ सहजता आहे. त्यामुळे तिचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. हिचे लाजणे पहात रहावेसे वाटते. हिच्या तोंडवळ्यावर नेहमीच पुष्कळ आनंद असतो.’’ या वेळी ते संत मला म्हणाले, ‘‘तूही हिच्यासारखे ‘कसे बोलायचे ? पटापट उत्तरे कशी द्यायची आणि कसे लाजायचे ?’, हे शिकून घे.’’ २ अ. पार्वतीला आश्रमात सेवेला येण्याविषयी विचारल्यावर तिने लगेच होकार देणे आणि याविषयी एका संतांना याविषयी काहीच ठाऊक नसतांना त्यांनी ‘तिची सेवेला येण्याची किती सिद्धता आहे !’, असे सांगणे : एका साधिकेने पार्वतीला दूरभाष करून ‘तू रामनाथी आश्रमात १५ दिवस सेवेसाठी रहायला येऊ शकते का ?’, असे विचारले होते. तेव्हा तिने कोणताही विचार न करता लगेचच होकार दिला. याविषयी संतांना काहीच ठाऊक नव्हते, तरीही ते मला म्हणाले, ‘‘तिची सेवेला येण्याची किती सिद्धता आहे ना ? नाहीतर इतर साधकांना सेवेचे महत्त्व ठाऊक असूनही ते स्वतःहून ‘सेवेला येऊ का ?’, असे विचारतही नाहीत. केवळ तिला विचारले आणि ती लगेचच ‘हो’ म्हणाली आणि आली ना ! पुढील वेळी आपणही यातून शिकून अशाच साधकांना सेवेला बोलवायचे.’’ २ आ. पार्वतीमधील गुणांमुळे तिने केलेली सेवा संतांना आवडणे : पार्वतीमधील निरागसता, शिकण्याची वृत्ती आणि भाव यांमुळे तिने केलेली प्रत्येक सेवा संतांना आवडायची. २ इ. संतांनी पार्वतीच्या यजमानांचे केलेले कौतुक ! : संतांनी पार्वतीच्या यजमानांची विचारपूस आणि खूप कौतुक केले आहे. ते म्हणायचे, ‘‘पार्वतीला रामनाथीला पाठवण्यामागे तिच्या यजमानांचा पुष्कळ त्याग आहे. ते घरी एकटे राहिले आहेत आणि पार्वतीला सेवेसाठी मोकळीक दिली आहे; म्हणून पार्वती हे सर्व करू शकते.’’
|
|