आता दुकाने आणि शॉपिंग मॉल चालू ठेवण्यास मान्यता
पणजी, २० जून (वार्ता.) – राज्यातील संचारबंदी आणखी एक आठवडा; म्हणजेच २८ जून या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून ही घोषणा केली. राज्यात ९ मेपासून संचारबंदी लागू आहे आणि तिच्या कालावधीत आता तिसर्यांदा वाढ करण्यात आली आहे. संचारबंदीचा कालावधी २१ जून या दिवशी सकाळी ७ वाजता संपुष्टात येणार होता.
संचारबंदीतील नियमांत किंचित पालट करतांना राज्यातील पालिका आणि पंचायत परिसर यांतील सर्व दुकाने आणि शॉपिंग मॉल सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी बांधकामाशी संबंधित दुकाने वरील वेळेत चालू ठेवण्यास मान्यता होती. आता मासळी बाजारही मर्यादित स्वरूपात चालू ठेवता येणार आहे; मात्र चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, करमणूक केंद्रे आदी बंदच रहातील.
लसीकरण पूर्ण होईपर्यंत पर्यटन बंदच राहील !
राज्यातील १०० टक्के लोकांना कोरोना लसीची किमान १ मात्रा (डोस) देणे पूर्ण झाल्याशिवाय पर्यटन चालू करणार नाही. ३० जुलैैपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय गोवा शासनाने ठेवले आहे. ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम् असोसिएशनने केलेल्या मागण्यांवर आम्ही विचार करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच दिली होती.