विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !
परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी मे २०२१ पर्यंत केवळ ३३८ हून अधिक ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली असून अन्य सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार लिखाणाचे संकलन, संरचना आणि विविध भाषांत भाषांतर करणे इत्यादी ग्रंथनिर्मितीच्या कार्यात आपण हातभार लावू शकता.
१. सनातनच्या आगामी ग्रंथांचे काही विषय
परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या संभाव्य ५ सहस्र ग्रंथांपैकी एकूण १ सहस्र ८२३ ग्रंथसंख्येची (४९ ग्रंथमालिकांच्या विषयांची) सूची ६.६.२०२१ या दिवशी, तर एकूण १ सहस्र ५२२ ग्रंथसंख्येची (२६ ग्रंथमालिकांच्या विषयांची) सूची १३.६.२०२१ या दिवशी प्रकाशित करण्यात आली होती. आज उर्वरित एकूण १ सहस्र ६५५ ग्रंथसंख्येची (१९ ग्रंथमालिकांच्या विषयांची) सूची या पृष्ठाच्या खालील भागात प्रकाशित करण्यात आली आहे. या सर्व विषयांचे लिखाण संगणकीय स्वरूपात सिद्ध आहे.
प्रस्तुत सूची वाचून आपल्यापैकी कुणाचा एखाद्या किंवा काही विषयांच्या संदर्भात अभ्यास असेल, तर अशा ग्रंथांच्या प्राथमिक संकलनासाठी आपण निश्चित वेळ देऊ शकता, तसेच आपल्या परिचितांपैकी या विषयांचे जाणकार असतील, तर त्यांनाही या ग्रंथसेवेत सहभागी होण्याविषयी आपण आवाहन करू शकता.
भावी युद्धकाळाच्या पूर्वी या सर्व ग्रंथांचे प्राथमिक संकलन झाले, तर युद्धाकाळानंतरच्या भावी पिढीला या ग्रंथांचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल.
२. ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा
२ अ. मराठी भाषेतील ग्रंथांचे संकलन करणे : यासाठी संगणकावर टंकलेखन करता येणे, तसेच मराठीचे व्याकरण आणि शब्दरचना यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
२ आ. लिखाणातील संस्कृत वचने, श्लोक आदी पडताळणे आणि त्यांचा मूळ संदर्भ लिहिणे : यासाठी साधकाला संस्कृत भाषेचे थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे.
२ इ. विविध भाषांतील ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची संगणकीय संरचना करणे : यासाठी ‘इन-डिझाईन’ या संगणकीय प्रणालीचे ज्ञान असावे.
२ ई. मराठी, हिंदी, कन्नड किंवा इंग्रजी भाषांतील ग्रंथांचे अन्य देशी-विदेशी भाषांत भाषांतर करणे : मराठी, हिंदी, कन्नड किंवा इंग्रजी या भाषेत ग्रंथ उपलब्ध आहेत. ही सेवा करण्यासाठी ‘आपण ज्या भाषेत भाषांतर करू इच्छिता’, त्या भाषेचे व्याकरणदृष्ट्या उचित ज्ञान असणे आवश्यक आहे. भाषेचे ज्ञान असेल; परंतु व्याकरणदृष्ट्या विशेष ज्ञान नसेल, तर त्यासंदर्भात प्रशिक्षण घ्यावे लागेल. संगणकीय ज्ञान (मराठीतील लिखाणाचे इंग्रजी भाषेत भाषांतर करण्याच्या सेवेसाठी MsWord आणि PDF या प्रणालींचे ज्ञान हवे.)
३. ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क करा !
वर उल्लेखिलेल्या सेवा सनातनच्या आश्रमात राहून किंवा घरी राहूनही करता येतील. ग्रंथ-निर्मितीशी संबंधित सेवा शिकण्यासाठी इच्छुकांना सनातनच्या आश्रमात २-३ आठवडे रहाता येईल. पुढे आश्रमात राहून किंवा घरी राहूनही सेवा करता येतील.
या सेवा करू इच्छिणार्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावी.
– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.५.२०२१)
आपत्काळापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित ग्रंथ लवकर प्रकाशित होणे आवश्यक !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलन केलेले; पण अद्याप अप्रकाशित असे सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या माध्यमातून यांतील ज्ञान शक्य तितक्या लवकर समाजापर्यंत पोचणे आवश्यक आहे. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. रामराज्यातील प्रजा सात्त्विक होती; म्हणून तिला श्रीरामासारखा आदर्श राजा मिळाला. रामराज्यासम सर्वांगसुंदर आणि आदर्श असे हिंदु राष्ट्र अनुभवता येण्यासाठी आजचा समाजही सात्त्विक होणे अपरिहार्य आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या ग्रंथांतील ज्ञानाने समाज सात्त्विक (साधक) होऊन तो हिंदु राष्ट्रासाठी पोषक होणार आहे. यातूनच हिंदु राष्ट्राची जडणघडण होणार आहे.
२. तिसरे महायुद्ध, महापूर इत्यादींच्या रूपांतील महाभयंकर आपत्काळातून वाचलो, तरच आपण हिंदु राष्ट्र पाहू शकू ! आपण साधना केली, तरच आपत्काळातून वाचू शकतो; कारण साधकांवर देवाची कृपा असते. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या ग्रंथांतून सुयोग्य, सध्याच्या पिढीला सहज पटेल असे वैज्ञानिक परिभाषेत आणि काळानुसार आवश्यक अशा साधनेचे ज्ञान मिळते. त्यामुळे या ग्रंथांचे महत्त्व असाधारण आहे.
३. प्रत्येकाची प्रकृती आणि आवड यांनुसार त्याला अध्यात्माचे शिक्षण मिळाले, तर त्याच्यात साधनेची आवड लवकर निर्माण होते, उदा. कलेची आवड असलेल्याला ‘कलेच्या माध्यमातून साधना कशी करता येते’, याचे ज्ञान मिळाले, तर तो ती साधना आनंदाने आणि तळमळीने करतो. परात्पर गुरु डॉ. आठवले हे विविधांगी विषयांवरील ग्रंथ संकलन करत असल्याने त्या माध्यमातून अनेक जण आपापली प्रकृती आणि आवड यांनुसार साधनेकडे लवकर वळू शकतील. (विविधांगी विषयांची तोंडओळख खाली असलेल्या ग्रंथांच्या सूचीवरून होते.)
४. हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई आपत्काळ आणि महायुद्ध चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे.
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जीवनगाथा, कार्य आणि उत्तराधिकारी यांच्याशी संबंधित १९ विषयांवरील ग्रंथमालिका !