जनतेसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याने इंधन दरवाढ ! – केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान

नवी देहली – मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत; मात्र गेल्या एक वर्षात कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या डोसवर ३५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च झाले आहेत. गरिबांना ८ मासांचा किराणा विनामूल्य देण्यासाठीच्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’वर १ लाख कोटी रुपये खर्च झाले.

शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसेच तांदूळ आणि गहू यांच्या किमान हमी भावाची घोषणा करण्यात आली. याव्यतिरिक्त देशात रोजगार आणि विकासकामे यांसाठी पैशांची आवश्यकता आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत, असे स्पष्टीकरण केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना दिले.