व्हॅटिकनने केरळमधील नन ल्युसी कलापुरा यांच्या हकालपट्टीच्या विरोधातील अंतिम आव्हान नाकारले !

  • कॅथॉलिक चर्चने खोटे आरोप करत नन ल्युसी यांना चर्चमधून हाकलल्याचे प्रकरण

  • ल्युसी यांना कॉन्व्हेंटमधील निवासस्थान सोडावे लागणार !

  • बलात्कारी बिशपच्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेतल्याने चर्चने केली होती हकालपट्टी !

(डावीकडे) बलात्काराचा आरोप असलेले बिशप फ्रँको मुलक्कल (उजवीकडे ) नन ल्युसी कलापुरा

कोची (केरळ) – केरळमधील कॅथॉलिक नन ल्युसी कलापुरा यांच्या हकालपट्टीच्या विरोधात करण्यात आलेले अंतिम आव्हान व्हॅटिकनमधील ख्रिस्त्यांच्या सर्वोच्च न्यायाधिकरणाने नाकारले. त्यानंतर नन ल्युसी कलापुरा यांना येथील कॉन्व्हेंटमधील निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे.

१. वर्ष २०१५ पासून ल्युसी यांचे त्यांच्या वरिष्ठांशी तणावाचे संबंध होते. कोची येथील एका ननवर बलात्काराचा आरोप असलेल्या जालंधरस्थित बिशप फ्रँको मुलक्कल याच्या अटकेच्या मागणीसाठी सप्टेंबर २०१८ मध्ये नन्सच्या सार्वजनिक आंदोलनात ल्युसी यांनी भाग घेतला होता. तेव्हापासून चर्च त्यांना हाकलण्याच्या मागावर होते.

२. मे २०१९ मध्ये खोट्या आरोपाखाली नन ल्युसी कलापुरा यांना चर्च सोडण्याचा आदेश देण्यात आला. त्याच वर्षी नन ल्युसी यांनी न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती; मात्र  सप्टेंबर २०१९ मध्ये ती नाकारण्यात आली. नंतर ल्युसी यांनी व्हॅटिकनमधील सर्वोच्च न्यायाधिकरणाकडे अंतिम दाद मागितली होती; परंतु तीही फेटाळण्यात आली.

मी भारतीय न्यायव्यवस्थेद्वारे न्याय मागणार ! – नन ल्युसी कलापुरा

व्हॅटिकनने आव्हान फेटाळल्याविषयी बोलतांना नन ल्युसी म्हणाल्या की, मी कॉन्व्हेंटमधील निवासस्थान रिकामे करणार नाही. मी भारतीय न्यायव्यवस्थेद्वारे न्याय मिळवीन. मी स्थानिक न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयाने निवासस्थान रिकामे करण्याच्या आदेशास तात्पुरती स्थगिती दिली आहे. याचिका अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. काहीही झाले, तरी मी कॉन्व्हेंटमधील निवासस्थान रिकामे करणार नाही.