इन्स्टाग्रामने हिंदु देवतांची आक्षेपार्ह चित्रे हटवली !

  • देहली उच्च न्यायालयाला दिली माहिती

  • आदित्य सिंह देसवाल यांनी केलेल्या याचिकेनंतर इन्स्टाग्रामची कृती !

  • देवतांचा अवमान रोखण्यासाठी कृती करणारे आदित्य सिंह देसवाल यांचे अभिनंदन ! प्रत्येक हिंदूने त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे !
  • न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्यावर इन्स्टाग्रामने चित्रे काढली आहेत. मुळात त्याने त्याच्या माध्यमावर अशा प्रकारची चित्रे कुणीच पोस्ट करू शकणार नाही, अशी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी ही चित्रे पोस्ट केली, त्यांची खाती कायमची बंद केली पाहिजेत !

देहली – इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी पोस्ट केलेली हिंदूंच्या देवतांची आक्षेपार्ह चित्रे आम्ही काढून टाकली आहेत, अशी माहिती इन्स्टाग्रामकडून देहली उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणी इन्स्टाग्राम आणि त्याची मालकी असणार्‍या फेसबूकला नोटीस बजावून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. ‘नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांचे पालन आस्थापनाकडून केले जात आहे कि नाही ?’ यासंदर्भातही न्यायालयाने विचारणा केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ ऑगस्ट या दिवशी होणार आहे.

१. इन्स्टाग्रामचे अधिवक्ता मुकुल रस्तोगी यांनी न्यायालयास सांगितले की,  इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त मजकूर काढून टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आस्थापनाकडून या खटल्याच्या संदर्भातील कारवाईची कोणतीही माहिती त्रयस्थ व्यक्तीला पुरवली जाणार नाही. नवीन माहिती-तंत्रज्ञान नियमांनुसार आस्थापनाने तक्रार निवारण अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. याच अधिकार्‍याकडे इन्स्टाग्रामच्या संदर्भातील तक्रारींचे दायित्वही देण्यात आले आहे.

२. नवीन माहिती-तंत्रज्ञान नियमांनुसार केंद्र सरकार आणि सामाजिक माध्यमे असणारी आस्थापने यांच्याकडून आवश्यक असणारी पावले उचलली गेली आहेत कि नाही ? यासंदर्भातील माहिती न्यायालयाने नोटीस पाठवून केंद्र सरकारकडून मागवली आहेत.

काय आहे प्रकरण ?

इन्स्टाग्रामवरील ‘इस्लाम की शेरनी’ नावाच्या खात्यावरून हिंदु देवतांचा अवमान करणारी चित्रे पोस्ट करण्यात आली होती. या चित्रांमध्ये अश्‍लील भाषा वापरून हिंदु देवतांची आक्षेपार्ह आणि वादग्रस्त चित्रे अन् व्यंगचित्रे पोस्ट करण्यात आली होती. याविरोधात आदित्य सिंह देसवाल यांनी इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या फेसबूकच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक