गावी असलेल्या घराची विक्री करतांना साधकाची झालेली विचार प्रक्रिया आणि साधकाला भगवंताचे पदोपदी लाभलेले साहाय्य !

१. आई-वडिलांनी घर विकण्यास प्रथम नकार देणे, आश्रमात काही मास राहिल्यावर त्यांचे मन रुळणे आणि त्यांनी घर विकण्यास होकार देणे 

श्री. राहुल कुलकर्णी

‘माझे आई-बाबा (सौ. सरस्वती कुलकर्णी आणि श्री. अरविंद कुलकर्णी) रामनाथी आश्रमात काही मास राहिल्यानंतर त्यांना मी गावाकडील घर विकण्याविषयी विचारल्यावर त्यांनी प्रथम नकार दिला. ‘घर विकण्याऐवजी ते मुलाच्या (माझ्या) नावावर करूया. आश्रमातून गावी जायची कधी इच्छा झाली, तर घर असावे’, असे त्यांचे विचार होते; पण काही मासांनंतर आश्रमात त्यांचे मन रुळल्यावर आश्रमातच रहाण्याची त्यांच्या मनाची सिद्धता झाली आणि त्यांनी घर विकण्यासाठी होकार दिला.

२. स्वत:च्या मनाची विचारप्रक्रिया

२ अ. ‘गावाशी असलेले नाते संपणार’, या विचारामुळे वाईट वाटणे : ‘गावी घर असल्यामुळे आश्रमातून काही दिवस घरी जायला मिळते’, असे मला वाटत होते. मी लहानपणापासून ज्या गावात वाढलो, ते सर्व सोडणे, हे आरंभी मला थोडे अवघड वाटले. ‘गावाशी असलेले नाते संपणार’, या विचाराने मला थोडे वाईट वाटले.

२ आ. घराच्या मालकीचे विचार मनात येणे आणि नंतर ‘घराविषयी आसक्ती असल्याने ते घर नको’, असे वाटणे : बाबा ते घर माझ्या नावावर करणार होते. त्यामुळे ‘माझे घर, मी घराचा मालक’, असे अहंयुक्त विचार माझ्या मनात आल्याची मला जाणीव झाली. माझ्या मनात ते विचार अनुमाने २ दिवस होते. त्यानंतर ‘माझे काहीतरी चुकत आहे’, याची मला जाणीव झाली. ‘घर माझ्या नावावर करून बाबा मुक्त होतील आणि मी त्यात अडकून राहीन. त्यापेक्षा मला ते घर नको. ते गाव, तो जिल्हा यांविषयी मला आसक्ती आहे, ते गावही मला नको’, अशी माझी विचारप्रक्रिया चालू झाली.

३. उत्तरदायी साधकांनी गावी असलेल्या मोठ्या बहिणीला माहेरी, म्हणजे रामनाथी आश्रमात येण्याचा निरोप देणे

​आम्ही (मी, आई-बाबा आणि माझी लहान बहीण) रामनाथी आश्रमात रहातो; पण माझी मोठी बहीण गावी रहाते. ‘घर विकणार, म्हणजे माहेर नसणार’, या विचाराने तिला वाईट वाटेल’, असा विचार करून उत्तरदायी साधकांनी आम्हाला तिला ‘गावाकडील तुझे घर नसले, तरी हा मोठा आश्रम तुझे माहेर आहे. तू कधीही इकडे येऊ शकतेस’, असा निरोप द्यायला सांगितला.

४. घराची विक्री करतांना आलेले अडथळे आणि ‘देव सतत समवेत असतो अन् तो साहाय्य करतो’, याविषयी आलेल्या अनुभूती

​‘घर विकणे’, हे भगवंताचे नियोजन असल्याने या संपूर्ण प्रक्रियेत भगवंत समवेत आहे आणि तोच येणार्‍या अडथळ्यांतून बाहेर काढत आहे’, याची मला जाणीव झाली.

​‘ठराविक व्यक्तीला घर विकायचे’, असा माझा विचार नव्हता. त्यानुसार मी माझे मित्र, मोठी बहीण आणि स्थानिक साधक यांना घरासाठी गिर्‍हाईक शोधण्यास सांगितले.

४ अ. ‘घराची वास्तुदेवता घर कुणाला सांभाळायला द्यायचे’, ते ठरवते आणि त्यानुसार त्या व्यक्तीला घर विकले जाईल’, असे जाणवणे

१. स्थानिक साधकांनी एका व्यक्तीशी व्यवहार करायचे ठरवले. त्यानुसार त्या व्यक्तीने घर बघितले आणि आगाऊ रक्कम म्हणून १०१ रुपये दिले. व्यवहार चालू असतांना आणि नंतरही मला अस्वस्थ वाटत होते. दुसर्‍या दिवशी त्या व्यक्तीने घर विकत घ्यायचे रहित केले. त्या वेळी मी साधकांना सांगितले, ‘‘घराची वास्तुदेवता घर कुणाला सांभाळायला द्यायचे’, ते ठरवते. त्यानुसार आपल्याला गिर्‍हाईक मिळते. त्यामुळे एखादे गिर्‍हाईक आले आणि त्यांना घर आवडले किंवा आवडले नाही, तरी त्याचा विचार करायला नको.’’

२. ‘१५.८.२०२० या दिवशी एक व्यक्ती घर पहायला येणार आहे’, असे मला कळल्यावर ‘घर विक्रीतील अडथळे दूर होऊ देत. मला स्थिर रहाता येऊ दे’, अशी प्रार्थना करून मी नामजप करत होतो. त्या वेळी मला आतून एक प्रकारचा आनंद जाणवू लागला. त्यानंतर साधकांनी मला कळवले, ‘‘त्या व्यक्तीला घर आवडले आणि तिने आगाऊ रक्कम घरातील देवघरासमोर ठेवली.’’ त्या वेळी मला जाणवले, ‘वास्तुदेवतेने ही वास्तू याच व्यक्तीला द्यायची ठरवली आहे.’

४ आ. घराची विक्री करण्यापूर्वी माझ्या आई-बाबांना घरी रहायला जायचे होते; पण कोरोना महामारीमुळे ते गावी गेले नाही. मी मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) करून एकटेच घरी जायचे ठरवले.

४ इ. देवाच्या कृपेमुळे साधकाच्या चारचाकीत जागा मिळून गावी पोचणे : गोव्यातून महाराष्ट्रातील गावी जाण्यासाठी मी रेल्वेचे तिकीट काढले होते. मी रेल्वेने गेलो असतो, तर मला सातारा येथे रात्री १२.३० वाजता उतरावे लागले असते आणि त्यानंतर ५० कि.मी. अंतरावर असलेल्या माझ्या गावी मला नेण्यासाठी एखाद्या साधकाचे नियोजन करावे लागले असते किंवा थांब्यावर रात्रभर थांबून सकाळी गावी जावे लागले असते. यामध्ये कोरोना संसर्गाचा धोका होता; पण मला आश्रमातील साधकाच्या चारचाकीतून सातार्‍यापर्यंत जाता आले. त्यामुळे मी गावी सायंकाळी पोचलो. या प्रवासात साधकाने मला परात्पर गुरु डॉक्टरांकडून त्याला शिकायला मिळालेली सूत्रे सांगितली. त्यामुळे मला पूर्ण प्रवासात देवाच्या अनुसंधानात रहाता आले.

४ ई. घर विकत घेणार्‍यांसाठीही प्रार्थना करणे : कागदपत्रे अमावास्येच्या आदल्या दिवशी सिद्ध झाली आणि मला अमावास्येच्या दिवशी मिळाली. ‘अमावास्या हा अशुभ दिवस असल्याने त्याचा परिणाम घर विकत घेणार्‍यांवर आणि आमच्यावर (घर विकणार्‍यावर) होऊ नये’, यासाठी मी घराच्या कागदपत्रांची ‘झेरॉक्स’ प्रत ‘प्लॅस्टिक’च्या पिशवीत ठेवून ती देवघराच्या खालच्या खणात ठेवली. मी कागदपत्रांना उदबत्ती दाखवून देवाला प्रार्थना करत होतो. घरमालकाला कागदपत्रे देण्यापूर्वी मी श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉक्टर आणि वास्तुदेवता यांना प्रार्थना केली, ‘जसे तुम्ही आम्हाला सांभाळले, तसे तुम्ही यांनाही (घर विकत घेतलेल्या कुटुंबालाही) सांभाळा.’

देवानेच माझ्याकडून कागदपत्रे देवापुढे ठेवण्याचा, त्याला उदबत्ती दाखवण्याचा, प्रार्थना करण्याचा विचार आणि कृती करवून घेतली.

४ उ. ‘भगवंत सतत साहाय्य करतो’, याची जाणीव करून देणारा प्रसंग : आमच्या घराच्या एका बाजूला अन्य पंथीय व्यक्ती रहाते. आम्ही आणि त्यांनी मिळून जागा विकत घेतली होती अन् दुसर्‍या बाजूला असलेल्या व्यक्तीने आमच्या जागेत अतिक्रमण करून भिंत बांधली होती. अन्य पंथीय व्यक्तीनेही जागेवरून आमच्याशी भांडणे केली होती. अशा रितीने दोन्ही बाजूनेही आमच्या जागेवर अतिक्रमण केले होते. मी घरून निघण्याच्या दिवशी घर विकत घेतलेली व्यक्ती आणि त्याचा भाऊ भूमी मोजणी करणार्‍या व्यक्तीला घेऊन आले. त्या वेळी दोन्ही बाजूकडील शेजारी बाहेर आले. त्या वेळी मला एकटेपणा जाणवून मी असाहाय्य असल्याची जाणीव झाली. तेव्हा मला माझ्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा दिसला आणि मी त्यांना तळमळीने प्रार्थना केली, ‘हा प्रसंग मला सांभाळता येणार नाही. ‘माझे रामनाथी आश्रमात येणे रहित होईल’, अशी मला भीती वाटते. मी ही भांडणे टाळण्याचा प्रयत्न करत होतो; मात्र आता ती चालू होतील.’ मी घरातून बाहेर आल्यावर आमच्या एका बाजूला असलेली अन्य पंथीय बाई आणि तिचा मुलगा आमच्या दुसर्‍या बाजूला असणार्‍या शेजार्‍याशी भांडू लागले. ‘त्या शेजार्‍याने आमच्या जागेत कसे अतिक्रमण केले आहे’, असे पटवून देऊन ते हटवण्यास सांगितले. अशा रितीने दोन्ही बाजूच्या शेजार्‍यांमध्ये भांडण चालू झाले आणि आमचे घर ज्याने विकत घेतले, त्यालाही जागेत अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आमचे घर विकत घेतलेली व्यक्ती मला म्हणाली, ‘‘अतिक्रमण झालेली आपली जागा परत कशी मिळवायची ?’, ते मी पहातो. तुम्ही काळजी करू नका. मी यासाठी तुम्हाला त्रास देणार नाही.’’

​नंतर २ दिवसांनी ज्यांनी आमचे घर विकत घेतले, त्याच्या नातेवाइकाचा मला भ्रमणभाष आला. ते मला म्हणाले, ‘‘शेजार्‍याने सांगितले, ‘‘तुमच्या जागेत बांधलेली भिंत आम्ही पाडतो. आम्हाला क्षमा करा.’’ त्यानंतर माझी त्या जागेविषयीची काळजी मिटली.

४ ऊ. घर अनेक मास बंद असूनही घरात दाब न जाणवणे : आमचे घर अनेक मास बंद होते, तरीही मला घरात दाब जाणवत नव्हता. मी घरात प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावायचो. त्यामुळे मला घरात प्रसन्न वाटायचे. घरात ‘माझ्या समवेत कुणीतरी आहे’, असे मला जाणवायचे. ‘मी एकटा आहे’, असे मला जाणवले नाही. मी घरात आल्यावर ‘एका सुरक्षित कवचामध्ये आहे’, असे मला वाटायचे. ‘आश्रमातून घरी गेल्यापासून ते घर विकून आश्रमात येईपर्यंत घर स्वच्छ ठेवणे, घरात सायंकाळी दिवा आणि उदबत्ती लावणे, या गोष्टी वास्तुदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवंत माझ्याकडून करवून घेत आहे’, याची त्याने मला जाणीव करून दिली.

४ ए. स्थानिक साधकांनी केलेले साहाय्य

१. श्री. रमेश गोडसे यांनी मला त्यांची सायकल वापरायला दिली. त्यामुळे मला सोयीचे झाले.

२. घर विक्री करण्यासाठी श्री. रमेश गोडसे आणि श्री. हंसराज पटेल यांनी मला पुष्कळ साहाय्य केले. त्यांनी घरासाठी गिर्‍हाईक शोधणे, त्यांच्याशी व्यवहार करणे, कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी नगरपंचायत, तलाठी कार्यालय येथे प्रत्येक वेळी माझ्या समवेत येणे, अशा प्रकारे मला साहाय्य केले. ज्यांनी घर विकत घेतले, ते श्री. युवराज जाधव यांनी आम्हाला आवश्यक तेथे साहाय्य करून कागदपत्रे उपलब्ध करून दिली.

३. श्री. हंसराज पटेल आणि श्री. रमेश गोडसे मला म्हणाले, ‘‘राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात तुमच्या पूर्ण कुटुंबाने वाहून घेतले आहे. तुम्ही त्यात पुढे जात आहात. त्यामध्ये घराचा अडथळा यायला नको; म्हणून आम्ही तुला साहाय्य केले.’’

५. घर विकत घेतलेल्या व्यक्तीला आलेली अनुभूती आणि तिचे आपुलकीचे वागणे

​घरावर पत्र्याचे छप्पर असूनही घर पहायला येणार्‍या व्यक्तींना घरात पुष्कळ थंडावा जाणवला. घरात भजने चालू असल्याने त्यांना घरात चांगले वाटत होते; म्हणून त्यांनी घर विकत घ्यायचे निश्‍चित केले.

​घर विकत घेतलेले युवराज जाधव आणि त्यांचा भाऊ मला म्हणाला, ‘‘जशी जागा आहे, तशी आम्ही घेऊ. कागदपत्राप्रमाणे जागेवर कोणी अतिक्रमण केले असेल, तर आम्ही त्याला प्रेमाने किंवा वेगळ्या पद्धतीने समजावून सांगू. तुम्ही साधी माणसे असल्याने लोकांनी तुम्हाला त्रास दिला. तुम्ही नंतर तुमच्या आई-वडिलांना गावी घेऊन आल्यावर तुम्हाला या घराच्या भोवती ‘कंपाऊंड’ (भिंत) बांधलेले दिसेल. ते पाहून तुमच्या आई-वडिलांना फार आनंद होईल. त्यांची इच्छा पूर्ण होईल. हे घर आम्ही विकत घेतले असले, तरी तुम्ही पुन्हा गावी आल्यावर इकडे या.’’​

६. घरातून आश्रमात येण्यासाठी भगवंताने केलेले साहाय्य

​माझे घराचे काम पूर्ण होत असतांना रामनाथी आश्रमातील साधक एका चारचाकीने गावी आले होते. त्यामुळे मला त्याच चारचाकीने रामनाथी आश्रमात परत येता आले.

७. ‘देव सतत समवेत आहे’, याची जाणीव होऊन व्यक्त केलेली कृतज्ञता

​माझ्या आई-बाबांनी कष्टाने घर बांधले. घरात आवश्यक त्या वस्तू आणून स्वतःचे घर साकार केले; पण घर विकण्याआधी त्यांची त्या घरात रहाण्याची इच्छा असूनही कोरोना संसर्गाच्या वातावरणामुळे ते घरी येऊ शकले नाहीत. त्यांनी उभ्या केलेल्या घरातील साहित्याची आणि घराची विक्री करतांना ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. ते केवळ आवश्यक तेवढे कपडे घेऊन आश्रमात गेले.

​भगवंताने वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून घराच्या विक्रीतील अडथळे दूर केले. घर विक्रीत साहाय्य करणार्‍या व्यक्तींप्रती मी कृतज्ञता व्यक्त केली; मात्र शेवटपर्यंत मी भगवंताची ही लीला समजू शकलो नाही.’

– श्री. राहुल कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२५.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक