गोव्यातील संचारबंदीत २१ जूनपर्यंत वाढ

सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत चालू ठेवण्यास मान्यता

पणजी, १३ जून (वार्ता.) – राज्यशासनाने संचारबंदीत २१ जून या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १२ जून या दिवशी रात्री उशिरा ट्वीट करून याविषयी माहिती दिली. राज्यात लागू असलेली संचारबंदी १४ जून या दिवशी सकाळी ७ वाजता संपुष्टात येणार होती. राज्यात ९ मेपासून तिसर्‍यांदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यशासनाने संचारबंदीत वाढ करतांना राज्यातील पालिका आणि पंचायत परिसर यांमधील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत खुली ठेवण्यास मान्यता दिली आहे. तसेच विवाहसोहळ्यासाठी अधिकाधिक ५० लोकांना उपस्थित रहाता येणार आहे; मात्र यासाठी आगाऊ मान्यता घ्यावी लागणार आहे.