‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि ‘ज्यामुळे माझ्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली’, असे अनुभवाचे क्षण मी त्यांच्या कोमल चरणी कृतज्ञतापुष्पांच्या रूपात अर्पण करते. मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते, ‘त्यांनीच मला सर्व लक्षात आणून माझ्याकडून लिहून घ्यावे.’
१. साधनेत येण्यापूर्वी
१ अ. शारीरिक आणि मानसिक ताण असतांना ‘ईश्वराची भक्ती केल्यावरच मनाला शांती मिळेल’, असा विचार मनात येणे : ‘वर्ष १९९८ मध्ये मला शारीरिक आणि मानसिक ताण होता. जवळ जवळ २ – ३ मास माझे मन अस्वस्थ होते. अशा स्थितीत ‘काय केल्याने माझ्या मनाला शांती मिळेल ?’, असे मला तीव्रतेने वाटत होते. ‘ईश्वराची भक्ती केल्यावरच मला हवी असलेली शांती मिळेल’, असे विचार सतत माझ्या मनात येत होते. त्या वेळी मी मुंबईच्या ‘के.ई.एम्.’ रुग्णालयात परिचारिकेची नोकरी करत होते. सौ. शहाणेकाकू (सौ. रूपाली वर्तक यांची आई) त्या वेळी या रुग्णालयात ‘फार्मासिस्ट’ होत्या. ‘अंबिका योग कुटीर’ या संघटनेच्या वतीने त्या परिचारिकांच्या निवासस्थानात योगासने शिकवण्यासाठी आल्या असतांना माझी त्यांच्याशी ओळख झाली.
२. सनातन संस्थेशी संपर्क
२ अ. गुरुपौर्णिमेसाठी अर्पण दिल्यावर पावतीवरील ‘गुरुकृपायोगा’चा लोगो पाहून ‘तुला जे पाहिजे, ते या ठिकाणी मिळेल’, असा आवाज ऐकू आल्यावर पुन्हा साधिकेकडे जाऊन साधना समजून घेणे : जुलै १९९८ मध्ये सौ. शहाणेकाकूंनी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमस्थळाचा (महोत्सवाचा) पत्ता मला देऊन मला कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. मी त्यांना ११ रुपये अर्पण दिले. याची पावती घेऊन ‘फार्मसी’ विभागातून बाहेर पडल्यावर त्या पावतीवर असलेल्या ‘गुरुकृपा’ या चिन्हाकडे (लोगोकडे) बघून मला आतून आवाज ऐकू आला, ‘तुला जे पाहिजे, ते या ठिकाणी मिळेल.’ मी पुन्हा शहाणेकाकूंच्याकडे जाऊन साधनेविषयी सर्व विचारले. त्या वेळी त्यांनी मला नामजप आणि साधना सांगून गुरुपौर्णिमा महोत्सवाला यायला सांगितले. हे स्थळ रुग्णालयाच्या जवळ होते.
२ आ. गुरुपौर्णिमा महोत्सवस्थळी गेल्यावर व्यासपिठावरील ‘गुरुकृपायोग’ या बोधचिन्हाच्या फलकाकडे पाहिल्यावर ‘त्या फलकाच्या आत प्रवेश करत आहे’, असे वाटणे : मी सभागृहात प्रवेश केल्यावर व्यासपिठावर बांधलेला ‘गुरुकृपायोग’ या बोधचिन्हाचा मोठा कापडी फलक दिसल्यावर ‘मी त्याच्या आत प्रवेश करत आहे’, असे मला वाटले. साधक भजने म्हणत होते. मला तेलुगु भाषा समजते. कार्यक्रम मराठी भाषेत असल्याने मला समजून घेण्यात अडचण येत होती; परंतु त्या ठिकाणचे वातावरण पुष्कळ आनंददायी असल्याने मी ध्यानाच्या स्थितीत गेले. ‘सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १.३० वाजेपर्यंत वेळ कसा गेला ?’, हे माझ्या लक्षात आले नाही.
२ इ. सत्संगात जाणे आणि सेवा करू लागणे : मला साधकांकडून सत्संगाचा पत्ता मिळाला. ते ठिकाण रुग्णालयाच्या जवळच असल्याने मी सत्संगाला जाऊ लागले.
२ इ १. सत्संगात सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर तोंडवळ्यावरील काळे डाग पूर्णत: नष्ट होणे : सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी ‘कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप दीड मास केल्यानंतर माझ्या तोंडवळ्यावरील काळे डाग पूर्णतः नष्ट झाले. माझ्या मनाला शांती मिळू लागली. मी ग्रंथ वितरण कक्षावर सेवा करू लागले.
३. परात्पर गुरुदेवांशी झालेली प्रथम भेट
३ अ. परात्पर गुरुदेवांना प्रथम पहातांना त्यांच्या चरणांकडे दृष्टी जाणे : ऑक्टोबर १९९८ मध्ये कु. वत्सला रेवंडकरताई परात्पर गुरुदेवांच्या दर्शनासाठी मला घेऊन गेली. त्या वेळी प्रथमच मी श्री गुरूंचे दर्शन घेतले. ते आसंदीत बसून लिखाण करत होते. त्या वेळी माझी दृष्टी आपोआपच त्यांच्या चरणांकडे जात होती.
३ आ. परात्पर गुरुदेवांच्या कृतीतून ‘दिसेल ते कर्तव्य’ याप्रमाणे वागण्याची शिकवण मिळणे : आम्ही परात्पर गुरुदेवांना भेटण्यासाठी जात असतांना आम्हाला मार्गिकेत एक ‘प्लास्टिक’ची पिशवी पडलेली दिसली. आमच्या दोघींच्या मनात ती पिशवी उचलण्याचा विचार येऊनही आम्ही ती उचलली नाही. परात्पर गुरुदेव आम्हाला भेटले, ते आमच्याशी बोलले आणि त्यांची लिखाणाची सेवा सोडून माझी अन्य साधकांशी ओळख करवून देण्यासाठी ते स्वतः आले. त्या वेळी मार्गिकेतून जातांना त्या ठिकाणी पडलेली पिशवी त्यांनी स्वतः वाकून उचलली. तेव्हा मला पश्चाताप झाला की, इतक्या मोठ्या व्यक्तीने वाकून पिशवी उचलली आणि आमच्या लक्षात येऊनही आम्ही ती कृती केली नाही. त्यांच्या या कृतीतून ‘जीवनात सतत चांगली कृती केली पाहिजे’, हे लक्षात आले.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– कु. सुगुणा गुज्जेटी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |