रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रम होत असलेल्या हवनाच्या वेळी करण्यास सांगितलेल्या श्री दुर्गादेवीच्या नामजपाच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

१. पोलादपूर

१ अ. श्री दुर्गादेवीचे सूक्ष्मातून दर्शन होऊन आध्यात्मिक त्रास उणावणे

​‘रात्री ८ ते ९ या वेळेत नामजप करत असतांना सूक्ष्मातून श्री दुर्गादेवीचे उजवे चरण दिसले. या चरणाच्या तळव्याला कुंकू लागले होते. दुपारी नामजपादी उपाय शोधतांना माझ्या आज्ञाचक्राशी त्रास जाणवला. त्या वेळी दुर्गादेवीने तिच्या उजव्या चरणाचा अंगठा माझ्या आज्ञाचक्राशी टेकवला. त्यामुळे माझा डोकेदुखीचा त्रास न्यून झाला. रात्री नामजप चालू असतांना प्रत्यक्षात आश्रमात हवन चालू असलेल्या ठिकाणी बसून स्वतःतील स्वभावदोषांची आहुती देत असल्याचे जाणवले. नंतर पुष्कळ शांत आणि सात्त्विक वाटले. अधूनमधून ‘प.पू. गुरुमाऊली आपल्यासाठी किती करत आहेत’, याची आठवण होऊन भावजागृती होत होती.’ – सौ. पल्लवी सुभाष सागवेकर

२. शिरढोण

२ अ. मुलगा वयाने लहान असल्यामुळे त्याला नामजप करता येणार नसल्याचे जाणवणे; मात्र त्याला काही वेळातच नामजप करायला जमणे

​‘आम्ही पती-पत्नी श्री दुर्गादेवी नामजपाचा ‘ऑडिओ’ लावून आणि जपमाळ घेऊन नामजप करायला बसलो. पंधरा मिनिटानंतर माझा लहान मुलगा हर्ष (वय ९ वर्षे) आमच्याकडे जपमाळ घेऊन आला आणि म्हणाला, ‘‘मला परात्पर गुरुदेवांनी सांगितलेला नामजप करायचा आहे.’’ तेव्हा मी त्याला म्हणाले, ‘‘रामनाथी आश्रमात हवन चालू आहे. तू माझा वेळ वाया घालवू नकोस. तुला नामजप करायला जमणार नाही. नवीन जपमाळ घेऊ नकोस.’’ असे म्हटल्यावर त्याने नवीन जपमाळ ठेवली आणि खणातून जुनी रुद्राक्षांची माळ आणली अन् आमच्याजवळ बसला. माझ्या मनात विचार आला, ‘याला काही नामजप जमणार नाही.’ मी त्याला म्हणाले, ‘‘ॐ नमः शिवाय ।’ म्हटल्यावर जपमाळेतील मणी ओढ.’’ त्याने पंधरा मिनिटांनंतर ‘ऑडिओ’ ऐकत नामजप केला आणि त्याच्या बाबांना म्हणाला, ‘‘बाबा, ‘ऑडिओ’ बंद करा. मला नामजप जमू लागला आहे.’’ त्याच्या बाबांनी ‘ऑडिओ’ बंद केला. हर्ष एवढा मोठा नामजप न चुकता बरोबर म्हणू लागला. हे बघून पुष्कळच आश्चर्य वाटले. एक घंटा बसून त्याने नामजप पूर्ण केला. ‘भगवंताने उच्च लोकातून जीव पाठवलेत. त्यांच्याकडून आपत्काळात भगवंतच नामजप करून घेऊन संरक्षककवच निर्माण करतो’, हे अनुभवायला मिळाले. ‘हे भगवंता, तूच हे अनुभवायला दिले.’ तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. नीलिमा विनायक वाकडीकर

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. हीपंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदनाजाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजेत्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकटसर्वांनाच येतील असे नाही. – संपादक