अतिक्रमण केलेल्या नागरिकांच्या घरात घुसले पावसाचे पाणी !

सातारा, ८ जून (वार्ता.) – सीमावाढीनंतर शाहूपुरी सातारा नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. शाहूपुरी परिसरातील ओढे आणि नाले सफाई रेंगाळल्यामुळे डोंगर उतारावरून आलेले पावसाचे पाणी थेट अतिक्रमण केलेल्या नागरिकांच्या घरात घुसले आहे. पेढ्याचा भैरोबा येथील डोंगर उतारावरून आलेले पावसाचे पाणी ओढे आणि नाले यांद्वारे वाहते; मात्र गत काही वर्षांमध्ये ओढे आणि नाले यांच्यावर अतिक्रमण करून नागरिकांनी घरे उभारली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक प्रवाहाची दिशा पालटली गेली आहे. प्रत्येक पावसाळ्यात ओढे आणि नाले यांची स्वच्छता होत होती; मात्र आता हे काम सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने होणार असल्यामुळे त्यावर मर्यादा येत आहेत. याविषयी स्थानिक नागरिकांनी सातारा नगरपालिकेला निवेदनही दिले आहे; मात्र त्याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.