सिलेगाव (भंडारा) येथे महिला ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यात मारामारी !

सिलेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवक यांच्यात मारामारी

भंडारा – जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सिलेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवक यांच्यात घरकुल ठरावाच्या खरेदीवरून ६ जून या दिवशी मारामारी झाली. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सिलेगाव ग्रामपंचायत येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनतर सरपंच संध्या पारधी या ग्रामसेवक मंजुषा शहारे यांच्याजवळील घरकुल ठरावाच्या भूखंडाच्या प्रती घेऊन जात होत्या. त्या वेळी ग्रामसेवक आणि इतर सदस्य यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दोघांमध्ये वाद आणि धक्काबुकी झाली. त्याचे रूपांतर मारामारीत झाले. महिला सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांनी एकमेकांना मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्परविरोधी तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत.