तमिळनाडूमध्ये एका गावामध्ये लोकांनी लस घ्यावी, यासाठी विनामूल्य बिर्याणी आणि भेटवस्तू देण्याची योजना

जनतेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठीही अशा प्रकारची योजना चालवावी लागते, यावरून जनता स्वतःच्या आरोग्याविषयीही किती निष्काळजी आहे, हे लक्षात येते !

कोलवम येथील लसीकरण केंद्र

चेन्नई (तमिळनाडू) – येथील कोलवम या मासेमार्‍यांच्या गावामध्ये लोकांनी कोरोना लस घ्यावी, यासाठी बिर्याणी आणि भेटवस्तू ‘लकी ड्रॉ’द्वारे विनामूल्य देण्याची योजना राबवण्यात येत आहे. यामुळे गावातील लोक लस घेत आहेत. ‘एस्टीएस् फाऊंडेशन’ या खासगी संस्थेकडून ही योजना राबवण्यात येत आहे.

या योजनेच्या घोषणेनंतर गेल्या ३ दिवसांत गावातील ३४५ जणांनी लस घेतली आहे. त्यापूर्वी २ मासांमध्ये केवळ ५८ जणांनीच लस घेतली होती. गावात ६ सहस्र ४०० हून अधिक लोक १८ वर्षांवरील आहेत. ‘लकी ड्रॉ’ प्रत्येक आठवड्याला काढण्यात येणार आहे. याद्वारे मिक्सर ग्राईंडर, सोन्याचे नाणे आदी भेटवस्तू देण्यात येणार आहेत, तसेच एक ‘बंपर ड्रॉ’ही काढण्यात येणार आहे. त्यात शीतकपाट, धुलाई यंत्र, स्कूटर या वस्तूही विनामूल्य देण्याचे नियोजन आहे. या योजनेमागे कोलवम गाव कोरोनामुक्त करणे, हा उद्देश आहे.