पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील ‘साई रिसॉर्ट’च्या अवैध बांधकामाची चौकशी चालू

अनिल परब यांचे दापोलीतील ‘साई रिसॉर्ट (सौजन्य : Afternoonvoice.com)

रत्नागिरी – रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील ‘साई रिसॉर्ट’च्या अवैध बांधकाम प्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीला प्रारंभ केला आहे. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि दापोली प्रांताधिकारी यांना या चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत साई रिसॉर्ट बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी २४ मे २०२१ या दिवशी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या आरोपासंबंधी कारवाई करण्याचा अर्ज दिला होता. त्यानंतर प्रशासनाकडून कार्यवाही चालू झाली आहे.

या आरोपानुसार मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून मौजे मुरुड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील गट क्र. ४४६ मधील साई रिसॉर्टच्या बांधकामासाठीची बिनशेती अनुमती, रस्ता, घरपट्टी, तसेच ‘सीआर्झेड’चे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. या प्रकरणी पालकमंत्री अनिल परब यांच्यासह अवैध बांधकामामध्ये आणि फसवणुकीमध्ये सहभागी असलेल्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.