पंतप्रधान बेरोजगार भत्त्याच्या नावाखाली ‘एनी डेस्क टीम व्हूवर ॲप’ची माहिती ‘व्हॉटस्ॲप’द्वारे पाठवून लोकांची लूट !

ग्राहकांचे अधिकोष खाते रिकामे होण्याची शक्यता असल्याने लोकांनी सावध रहावे ! – पोलिसांचे आवाहन

नागरिकांनो, सामाजिक संकेतस्थळांवर वैयक्तिक माहिती भरतांना सतर्कता बाळगा !

चंद्रपूर – ‘व्हॉटस्ॲप’वर दिसणार्‍या ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्त्या’च्या एका लिंकच्या माध्यमातून भ्रमणभाषमध्ये ‘एनी डेस्क टीम व्हूवर ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगण्यात येत आहे. या ‘ॲप’द्वारे ग्राहकांच्या अधिकोष खात्यातील रक्कम चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी काळजी घेऊन ‘व्हॉटस्ॲप’वर आलेली ही लिंक उघडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘तुम्ही बेरोजगार असाल, तर तुमची माहिती एका संकेतस्थळावर भरण्यास सांगण्यात येते. त्यासाठी तुम्हाला दूरभाष करून प्रतिमास अडीच ते साडेतीन सहस्र रुपयांपर्यंत बेरोजगार भत्ता मिळेल’, असेही सांगण्यात येत आहे. केवळ त्यासाठी लोकांना ‘एनी डेस्क’ नावाचे ‘ॲप’ डाऊनलोड करायला सांगितले जाते. हे ‘ॲप’ म्हणजे ‘क्लोनिंग ॲप’ आहे. ‘ॲप’ ‘डाऊनलोड’ची माहिती चोरटे देतात. बेरोजगारांना माहिती भरायला सांगण्यात येणारी ‘लिंक’ बनावट आहे. त्यातून चोरटे लोकांच्या संपर्काची माहिती घेऊन भ्रमणभाष ‘हॅक’ करून लोकांना फसवत आहेत. असे प्रकार राज्यात सर्वत्र चालू झाले आहेत. चंद्रपूर पोलिसांनी याविषयी गुन्हा नोंद करून अशा खोट्या संकेतस्थळावर कारवाई होण्यासाठी ‘गूगल’समवेतही पत्रव्यवहार चालू केला आहे.