योगऋषी रामदेवबाबा यांच्या विरोधात अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची दर्पोक्ती
योगऋषी रामदेवबाबा यांनी स्वतः आयुर्वेदाचार्य असल्याचा दावा केला नाही. असे असतांना त्यांना आयुर्वेदाचा प्रसार करणे चुकीचे कसे ? आयुर्वेदाचा प्रसार करण्यामुळे कुणाच्या पोटात का दुखते ? आरोग्य क्षेत्रात गोरगरिबांची लूट करणार्यांच्या विरोधात सरकार आणि प्रशासन यांनी योग्य ती कारवाई करावी !
मुंबई – ज्या व्यक्तीने कुठल्याही ‘मेडिकल कौन्सिल’कडून पदवी घेतलेली नाही, ती उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. विनापदवी कुणी डॉक्टर होत असेल, तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी योगऋषी रामदेवबाबा यांना उद्देशून केली आहे. योगऋषी रामदेवबाबा यांनी काही दिवसांपूर्वी ‘अॅलोपॅथी’ उपचारपद्धतीविषयी शंका घेणारे काही प्रश्न उपस्थित केले होते. यावरून नवाब मलिक यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.
या वेळी नवाब मलिक म्हणाले, ‘‘रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची पदवी नाही; मात्र उपचार करण्यावरून ते सतत काही विधाने करतात. राज्यघटनेनुसार वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण देशाचे कामकाज चालते. अविश्वास आणि अंधविश्वास यांचा प्रचार कुणी करत असेल, तर ते देशाला घातक आहे. रामदेवबाबा लोकांना सल्ला देऊ शकतात; मात्र स्वत:चे दुकान चालवण्यासाठी ते वक्तव्य करत असतील, तर हे चुकीचे आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने रामदेवबाबा यांचे विधान गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. देशात अॅलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व औषधोपचारांना मान्यता देण्यात आली आहे. त्या वेळी वेगवेगळे ‘मेडिकल कौन्सिल’ सिद्ध करण्यात आले आहे. वैज्ञानिक पद्धतीने जी उपचारपद्धती आहे, तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था सिद्ध करण्यात आली आहे.’’