प्रतिकूल परिस्थितीत देवाची कृपाच आपणास तारून नेऊ शकते, नामस्मरणाने मनोबल वाढते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कोरोना महामारीच्या काळात मनाची स्थिती स्थिर कशी ठेवावी?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संग

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पणजी – कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्यातून देवाची कृपाच आपणास तारून नेऊ शकते. देवाची कृपा संपादन करण्यासाठी त्याचे नामस्मरण करणे, हा सर्वोत्तम उपाय आहे. विशिष्ट पद्धतीने केलेला नामजप आपणास कोरोना महामारीच्या काळात आपले मनोबल वाढवू शकतो; मात्र या नामजपात सातत्य असणे आवश्यक आहे. याचसमवेत मन स्थिर ठेवण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकतो. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेअंतर्गत मनाला स्वयंसूचना दिल्याने मन स्थिर रहाण्यास साहाय्य होते, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कोरोना महामारीच्या काळात मनाची स्थिती स्थिर कशी ठेवावी ?’, या विषयावर गोव्यातील धर्मप्रेमींसाठी आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगात त्या मार्गदर्शन करत होत्या. या कार्यक्रमाचा उद्देश हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी स्पष्ट केला. या ‘ऑनलाईन’ सत्संगाचा ३७० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

कोरोनाच्या काळात आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी करावयाचा नामजप

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये मार्गदर्शनात पुढे म्हणाल्या, ‘‘कोरोना महामारीच्या काळात शारीरिक, मानसिक बळासह आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी सनातन संस्थेने सांगितलेला ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ (३ वेळा) – ‘श्री गुरुदेव दत्त ।’ – ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ (३ वेळा) – ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन १०८ वेळा एका जागी बसून आणि नियमितपणे करणे आवश्यक आहे. ‘सनातन चैतन्यवाणी’ या ॲपवर हा नामजप उपलब्ध आहे. ‘गूगल प्ले स्टोअर’वरून जिज्ञासू ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप ‘डाऊनलोड’ करू शकतात. हा नामजप सध्या विविध सुमारे ७० हून अधिक रुग्णालयांमध्ये नियमितपणे ऐकला जात आहे. या नामजपामुळे मनोधैर्य, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढणे आदी अनेक लाभ सहस्रो जिज्ञासूंना आतापर्यंत झालेले आहेत. तरी या नामजपाचा सर्वांनी लाभ घ्यावा. ’’

सद्गुरु (कु.) स्वाती खाड्ये यांनी मार्गदर्शनात पुढे हिंदु धर्मावर विविध माध्यमांतून होणार्‍या आघातांविषयी माहिती देण्यात आली. तसेच हिंदूंनी हे आघात सनदशीर मार्गाने रोखण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

क्षणचित्र

सत्संग झाल्यानंतर काही जिज्ञासूंनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेअंतर्गत स्वयंसूचना कशी द्यायची ? नामजपादी उपाय आदींविषयी माहिती जाणून घेतली.

अभिप्राय

१. सत्संगात मन भरून आले. पूर्वी मला पैसा श्रेष्ठ आहे असे वाटत होते; मात्र ईश्वराचा नामजपच श्रेष्ठ आहे, हे आता लक्षात आले ! – सौ. वनिता पडवळ, म्हापसा

२. कोरोना महामारीच्या कठीण काळातही कसे स्थिर राहू शकतो, हे शिकायला मिळाले आणि खूप सकारात्मकता निर्माण झाली, असा अभिप्राय अनेकांनी व्यक्त केला.