मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीला अर्थसाहाय्य करणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावाला यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून २९ मे या दिवशी अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी दिली आहे.
युसूफ लकडावाला यांच्यावर ५० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर फसवणूक, आर्थिक अपहार आणि अवैधपणे भूमी बळकावणे आदी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाग्यनगरचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या वंशजांच्या मालकीची खंडाळा येथील भूमी अनधिकृतरित्या बळकावल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. वारंवार नोटीस पाठवूनही अन्वेषणासाठी उपस्थित न राहिल्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. याविषयी अंमलबजावणी संचालनालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आर्थिक अपहाराचे अन्वेषण करतांना युसूफ लकडावाला यांच्या अनेक मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक डाटा कह्यात घेण्यात आला आहे.