आता गुळणीद्वारे कोरोनाची चाचणी करता येणार !

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून चाचणीला मान्यता !

सलाईन गार्गल आर्टी-पीसीआर् पद्धत

मुंबई – खारट पाण्याची गुळणी करून त्याचा नमुना एका बंद ‘ट्यूब’मध्ये घेऊन त्याद्वारे कोरोनाची चाचणी करण्याची नवीन पद्धत विकसित करण्यात आली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अंतर्गत असलेल्या नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) शास्त्रज्ञांनी ही पद्धत शोधून काढली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून या चाचणीला मान्यता देण्यात आली आहे. या पद्धतीमध्ये ३ घंट्यांमध्ये कोरोनाच्या चाचणीचा अहवाल कळतो. ‘सलाईन गार्गल आर्टी-पीसीआर्’ असे या पद्धतीचे नाव आहे. ही चाचणी कशी करावी ? याचे प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) शास्त्रज्ञांना देशभरातील विविध ठिकाणच्या प्रयोगशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. ‘ही पद्धत ग्रामीण, तसेच दुर्गम भागांत लाभदायी ठरू शकेल’, असे तज्ञांचे मत आहे.

अशी आहे चाचणीची पद्धत !

या पद्धतीमध्ये चाचणी करावयाच्या व्यक्तीला खारट पाण्याची गुळणी करून ती सामान्य ‘कलेक्शन ट्यूब’मध्ये जमा केली जाते. हा नमुना प्रयोगशाळेत पडताळण्यासाठी पाठवला जातो. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेकडून सिद्ध करण्यात आलेल्या एका विशिष्ट रसायनामध्ये हा नमुना ठेवला जातो. हे रसायन गरम केल्यानंतर त्यावर ‘आर्टी-पीसीआर्’ची प्रक्रिया केली जाते. त्यावरून चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आहे कि ‘निगेटिव्ह’ हे कळू शकते.

स्वत:चे नमुने घेण्याला अनुमती !

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार म्हणाले, ‘‘चाचणीच्या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे, हे स्वस्त पडते. लोक स्वतःहून ही चाचणी करू शकतील. चाचणीसाठी नमुने देतांना नागरिकांना चाचणी केंद्रांवर वाट पहाण्याची किंवा गर्दीत उभे रहाण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीत न्यूनतम कचरा निर्माण होतो, तसेच संक्रमणाचा धोका अल्प करण्यासाठी ही पद्धत लाभदायी ठरेल.’’