‘रेमडेसिविर काळाबाजार’च्या प्रकरणी त्वरित कारवाई होण्यासाठी शनिशिंगणापूर (नगर) येथे आंदोलन

असे आंदोलन का करावे लागते ? पोलीस स्वत:हून त्वरित कारवाई का करत नाहीत ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सोनई (नगर) – वडाळाबहिरोबा येथील रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणाचा तपास लवकर व्हावा, तसेच संबंधित कोविड सेंटर आणि औषध दुकान यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नेवासे तालुका काँग्रेसच्या वतीने शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यासमोर ४ घंटे धरणे आंदोलन करण्यात आले. पसार आरोपीवर लवकरच गुन्हा नोंद करण्याच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नगरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने वडाळाबहिरोबा येथे धाड टाकून रेमडेसिविरचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणात ४ आरोपींना अटक केली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास शनिशिंगणापूर पोलिसांकडे असतांना १८ दिवस उलटूनही पसार असलेल्या मुख्य आरोपीस अटक झालेली नाही. (ही पोलिसांची अकार्यक्षमता आहे कि तपास करण्याविषयी असलेली अनास्था ? – संपादक)

तालुका काँग्रेस अध्यक्ष संभाजी माळवदे म्हणाले की, या गंभीर प्रकारानंतर दोषी व्यक्तींना पाठीशी घालणे चुकीचे आहे. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्यास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल.