सात्त्विक नक्षी असलेले अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ! – पू. (सौ.) भावना शिंदे

श्रीलंका येथे ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत अलंकारांविषयी संशोधन सादर !

पू. (सौ.) भावना शिंदे

मुंबई – अलंकार हे समाजाला आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक लाभ मिळवून देऊ शकतात, तसेच स्त्रियांना त्यांच्या साधनेत साहाय्यभूत होऊ शकतात. धातूंमध्ये ‘सुवर्ण’ हा आध्यात्मिकदृष्ट्या सर्वाधिक लाभदायक धातू जरी असला, तरी या धातूपासून बनवलेल्या अलंकारांची नक्षी सात्त्विक नसल्यास त्यापासून अलंकार परिधान करणार्‍याला अपेक्षित आध्यात्मिक लाभ मिळू शकत नाही. अलंकार कसा बनवला आहे, यावर त्यातून सात्त्विक, राजसिक कि तामसिक स्पंदने प्रक्षेपित होतील, हे ठरते. हा आध्यात्मिक स्तरावरील दृष्टीकोन ज्ञात नसल्यास केवळ मानसिक स्तरावर विचार करून निवडलेल्या अलंकाराद्वारे व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या फारसा लाभ मिळत नाही. त्यामुळे सात्त्विक नक्षी असलेला अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या पू. (सौ.) भावना शिंदे यांनी केले. त्या ‘दी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, श्रीलंका’ यांनी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ७ व्या ‘वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वूमन्स स्टडीज् २०२१’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या. या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी ‘अलंकारांचा स्त्रियांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले असून पू. (सौ.) भावना शिंदे या सहलेखिका आहेत.

​या परिषदेतील सांस्कृतिक आदानप्रदानाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले संगीत आणि नृत्य यांचे प्रत्येकी एक एक सात्त्विक सादरीकरण आणि त्यांचा आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम यांविषयी संशोधनावर आधारित एक चलचित्र दाखवण्यात आले. गळ्यातील तीन प्रकारच्या हारांचे ते परिधान करणार्‍यांवर होणारे सूक्ष्म परीणाम अभ्यासण्यासाठी प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र अन् सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून केलेल्या संशोधनाची माहिती पू. (सौ.) भावना शिंदे यांनी उपस्थितांना दिली. या संशोधनासाठी माजी अणुवैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी विकसित केलेल्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा आणि ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. ‘यू.ए.एस्.’ आणि ‘पिप’ यांद्वारे वस्तू अन् व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो.

या संशोधनाच्या अंतर्गत केलेल्या प्रयोगात तीन प्रकारच्या हारांचे परीक्षण केले. पहिला हार ‘फॅशन ज्वेलरी’ किंवा ‘जंक ज्वेलरी’ या प्रकारात मोडणारा होता. दुसरा आणि तिसरा हे दोन्ही हार २२ कॅरेट सोन्याचे होते. दुसर्‍या हाराची नक्षी असात्त्विक, तर तिसर्‍या हाराची नक्षी सात्त्विक होती. पहिल्या आणि दुसर्‍या हारातून नकारात्मक, तर केवळ तिसर्‍या हारातून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे प्रभावळ अन् ऊर्जा मापक यंत्रांनी केलेल्या परीक्षणात दिसून आले. यातून सात्त्विक नक्षी असलेला अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे, हे स्पष्ट झाले. हे ३ हार, बांगडी आणि अंगठी या अलंकारांची सूक्ष्म स्पंदनशास्त्राचा अभ्यास करून काढलेली चित्रे या वेळी पू. (सौ.) भावना शिंदे यांनी सर्वांना दाखवली. त्यामुळे उपस्थितांना सात्त्विक आणि असात्त्विक अलंकारांसंदर्भात सूक्ष्मातून घडणारी प्रक्रियाही जाणता आली.

विशेष​

या कार्यक्रमाचे फेसबूकद्वारे थेट प्रसारण करण्यात आले. हा कार्यक्रम १ सहस्र ६०० हून अधिक जणांनी पाहिला.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक