सातारा, २९ मे (वार्ता.) – काही दिवसांनी आषाढी वारी आहे; मात्र कोरोनाचा विळखा अजूनही घट्ट आहे. कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर घटत नाही. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाविषयी उपाययोजनाही अल्प पडत आहेत. अशीच स्थिती कायम राहिली, तर यावर्षी प्रातिनिधिक वारीसुद्धा होणार नाही, अशी शक्यता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. सातारा जिल्ह्याचा कोरोनाविषयी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ते २८ मे या दिवशी सातारा येथे आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, तसेच जिल्ह्यातील आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अजित पवार यांना माऊलींचा पालखी सोहळा रहित करण्याविषयी सूचना केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील ज्या ज्या गावांतून पालखी जाते, त्या त्या ठिकाणी भाविकांची गर्दी होणारच आहे. त्यामुळे जसजशा वारी रहित करण्याच्या सूचना पुढे येतील, तस तसे राज्य सरकार योग्य तो निर्णय घेऊन वारीतील संसर्ग टाळण्यासाठी वारी रहित करण्याचा निर्णय घेऊ शकते.’’
आषाढी वारीसोहळा पायी नसावा ! – संजय गायकवाड, मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषदसध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यूही झालेला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल, तर आषाढी वारीचा सोहळा हा पायी नसावा, असा अभिप्राय फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी समितीला पत्राद्वारे कळवला आहे. |