सातारा, २९ मे (वार्ता.) – येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनाविषयक आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी केली नसतांना ती केल्याचा बनावट अहवाल ५ जणांनी मिळवल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १४ आणि १५ ऑक्टोबर २०२० या दोन दिवसांत जिल्हा रुग्णालयात कोरोनाची चाचणी केल्याचे ५ जणांनी सांगितले; परंतु जिल्हा रुग्णालयातील नोंदवहीमध्ये संशयितांनी चाचणी केल्याची नोंद नाही. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी केली. त्यामध्ये संशयितांचे अहवाल बनावट असल्याचे सिद्ध झाले. तेव्हा जिल्हा रुग्णालयाचे आधुनिक वैद्य ज्ञानेश्वर हिरास यांनी जिल्ह्यातील महेश जाधव, हरिदास कुंभार, प्रमोद माने, अजय डुबल आणि गणेश घोरपडे यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद केला.