कराड येथे रुग्णवाहिका दरनिश्‍चितीचा चालक-मालक संघटनेकडून निषेध

(प्रातिनिधिक छायाचित्र)

कराड, २६ मे (वार्ता.) – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकांचे दर निश्‍चित करण्यात आले असून दरपत्रकानुसार भाडे आकारणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अन्यायकारक दरनिश्‍चितीचा रुग्णवाहिका चालक-मालक संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे.

मलकापूर येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत १६ रुग्णवाहिकांचे चालक-मालक सहभागी झाले होते. या वेळी परिवहन कार्यालयाकडून देण्यात आलेल्या दरपत्रकावर चर्चा झाली. सध्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच कोरोना काळात ऑक्सिजन, सॅनिटायझर, पीपीई किट, हॅण्डग्लोज आदींचा उपयोग वाढल्यामुळे भाडेवाढ करण्यात आली आहे. जुलै २०२० मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रुग्णवाहिकेसाठी दर निश्‍चित केले होते. त्या वेळी पेट्रोल ८९ रुपये, तर डिझेल ७० रुपये प्रतिलिटर होते. आज पेट्रोल १०० रुपये, तर डिझेल ९० रुपयांच्या पुढे गेले आहे. तसेच रुग्णाला सोडल्यानंतर रुग्णवाहिका सॅनिटाईझ करावी लागते. त्याचा अतिरिक्त व्यय रुग्णवाहिका चालक-मालक यांनाच करावा लागतो. नागरिकांना सुरक्षा आणि चांगली सेवा देणे हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विचार करून योग्य दर निश्‍चित करावेत, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.