कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख का केला जात नाही ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

अशा लोकांच्या कुटुंबियांना सरकार ४ लाख रुपये भरपाई देऊ शकते का ?


नवी देहली – कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख का केला जात नाही ? जर सरकारने अशांच्या नातेवाइकांसाठी एखादी योजना लागू केली, तर त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल ?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे. ‘कोरोनाबाधिताच्या मृत्यू प्रमाणपत्रावर त्याच्या मृत्यूचे कारण ‘कोरोना’ लिहिले जाऊ शकते का ? अशा लोकांच्या कुटुंबियांना सरकार ४ लाख रुपये भरपाई देऊ शकते का ? याचे उत्तर १० दिवसांत द्यावे’, असा आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला या वेळी दिला. यावर ११ जून या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे. एका याचिकेद्वारे ‘कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबांना ४ लाख रुपये भरपाई देण्यात यावी’, अशी मागणी करण्यात आली आहे.

सुनावणीच्या वेळी न्यायालयाने म्हटले की, कोरोनाबाधिताच्या मृत्यू प्रमाणपत्रावर ‘फुप्फुस आणि हृदय काम करत नाही’, असे वेगळेच कारण लिहिलेले असते. हे मी स्वत: पाहिले आहे. मृत्यूचे खरे कारण तर कोरोनाच असते. त्यामुळे सरकारने जर अशा लोकांसाठी एखादी योजना सिद्ध केली, तर ‘संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचे कारण कोरोना संसर्ग होते’, हे कसे सिद्ध होईल ? ते सिद्ध करण्यासाठी कुटुंबियांना धावाधाव करावी लागेल.’ त्यावर सरकारी अधिवक्ता म्हणाले की, कोरोनाबाधितांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या दिशानिर्देशांनुसारच कारण लिहिले जाते.