योगऋषी रामदेवबाबा यांच्याकडून आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून अ‍ॅलोपॅथीविषयीचे विधान मागे !

नवी देहली – योगऋषी रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथीविषयी केलेले कथित वक्त्यव्य मागे घेत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून सांगितले आहे. या पत्रात योगऋषी रामदेवबाबा यांनी लिहिले आहे, ‘डॉ. हर्षवर्धन, तुमचे पत्र मिळाले. वैद्यकीय पद्धतींच्या संपूर्ण विवादास विराम देऊन मी माझे विधान मागे घेतो. मी हे पत्र तुम्हाला पाठवत आहे.’ तत्पूर्वी डॉ. हर्षवर्धन यांनी योगऋषी रामदेवबाबा यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘आपले अ‍ॅलोपॅथीविषयीचे विधान संपूर्ण देशाच्या भावना दुखावणारे आहे. त्या वक्तव्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या मनोबलास धक्का पोचू शकतो आणि कोरोनाच्या विरोधातील आपली लढाई कमकुवत होऊ शकते.’ योगऋषी रामदेवबाबा यांच्या वक्तव्याच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने एका व्हिडिओचा संदर्भ देत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

रामदेवबाबा यांनी विधान मागे घेणे, हे स्वागतयोग्य आणि त्यांच्या परिपक्वतेचे उदाहरण ! – डॉ. हर्षवर्धन

‘योगऋषी रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीवर केलेले वक्तव्य मागे घेत प्रकरणाला विराम दिला आहे. हे स्वागतयोग्य आणि त्यांच्या परिपक्वतेचे उदाहरण आहे. भारताने कोरोनाचा सामना अत्यंत दृढनिश्‍चयाने केला हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे. आपला विजय निश्‍चित आहे’, असे या उत्तरावर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.