गृह विभागाची प्रतिमा मलीन करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांनी महाराष्ट्र ही कर्मभूमी असल्याचे विसरून चालणार नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलीस अधिकारी परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना गृहमंत्र्यांची चेतावणी !

पोलीस जिमखाना येथे आढावा बैठकीमध्ये बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

गडचिरोली – ‘काही वरिष्ठ आय.पी.एस् अधिकार्‍यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उपद्व्याप केल्याने राज्याच्या गृह विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे; पण त्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी असल्याचे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांनी राज्याशी प्रामाणिक राहून आपले कर्तव्य बजावायला हवे’, अशा शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव न घेता त्यांना चेतावणी दिली आहे. (भ्रष्टाचारी आणि स्वार्थी पोलीस अधिकार्‍यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असतांना याला पोलीस अधिकार्‍यांसमवेत लोकप्रतिनिधीही तितकेच उत्तरदायी आहेत. पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करून लोकप्रतिनिधीच गुन्हेगारांना गुन्हे करण्यास मोकळीक देत असतात. राजकीय पक्षांनीच पोलिसांना ‘ताटाखालचे मांजर केले’ आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी पोलिसांवर कठोर कारवाई आणि राजकीय हस्तक्षेप थांबवल्यास पोलीस दलाची प्रतिमा नक्कीच उंचावेल ! – संपादक)   

जिल्ह्यातील कटेझरी पोलीस साहाय्य केंद्र हे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेले पोलीस साहाय्य केंद्र आहे. तेथे जाऊन गृहमंत्री वळसे पाटील यांनी पोलिसांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गडचिरोली येथून परत आल्यानंतर त्यांनी नागपूर पोलीस जिमखाना येथे आढावा बैठक घेतली.

ते पुढे म्हणाले की, सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सायबर गुन्ह्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. पोलीस कर्मचार्‍यांसाठी घरे निर्माण करण्याला आपले प्राधान्य रहाणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात पोलीस भरती कशी घ्यावी ? यावर अभ्यास करण्यात येत आहे. गडचिरोलीजवळील छत्तीसगड सीमेवरील नक्षलवादासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सीमाभागात नक्षल प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबवण्याविषयी चर्चा करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.