‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
एका शहरातील एका साधिकेला खासगी कोविड रुग्णालयामध्ये आलेला कटू अनुभव
एका साधिकेला तिच्या आईला न्यूमोनिया झाला असता साधिकेच्या आईला घराजवळ असलेल्या रुग्णालयात चांगले उपचार मिळतील, या आशेने भरती करण्यात आले; पण तेथे त्यांच्यावर उपचारही करण्यात आले नाहीत. यासंदर्भात साधिकेला आलेले कटू अनुभव या लेखात दिले आहेत.
मी एका शहरातील एका शासकीय रुग्णालयामध्ये ‘स्टाफ’ परिचारिका म्हणून काम करते. २४ मार्च या दिवशी माझ्या भाचीला आणि आईला बरे वाटत नसल्याने मी आमच्या घराजवळ असलेल्या आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलो. औषधोपचारानेही बरे वाटत नसल्याने २५ मार्च या दिवशी दोघींची कोरोनाविषयक तपासणी केली. २७ मार्च या दिवशी दोघींचाही अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आला. त्यानंतर घरातील आम्ही सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह झालो. आम्हाला घरी राहूनच उपचार घेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. २९ मार्च या दिवशी ‘सिटी स्कॅन’ केल्यावर आईला ११ टक्के न्यूमोनिया झाल्याचे कळले. आईचे वय ७५ वर्षे असल्याने आईला उपचार सहन होत नव्हते; म्हणून आमच्या फॅमिली डॉक्टरांनी आईला एका खासगी रुग्णालयात भरती होण्यास सांगितले.
महिला रुग्णाला रुग्णालयात भरती करतांना व्यवस्थापनाने रोख रक्कम आगाऊ भरण्यास सांगणे आणि फॅमिली डॉक्टरांनी भ्रमणभाष केल्यावर जास्त रकमेचा धनादेश घेऊन रुग्णाला ‘जनरल वॉर्ड’मध्ये भरती करून घेणे
मी आईला भरती करण्यासाठी त्या रुग्णालयात घेऊन गेले. त्या वेळी मला स्वागतकक्षावर ४० सहस्र रुपये रोख रक्कम आगाऊ भरण्यासाठी सांगण्यात आले; परंतु माझ्याकडे रोख पैसे नव्हते. मी त्यांना धनादेश देते म्हणून सांगितले; पण ते ऐकत नव्हते. शेवटी मी माझ्या फॅमिली डॉक्टरांना भ्रमणभाष केला. त्यांनी रुग्णालयात भ्रमणभाष केल्यावर रुग्णालय व्यवस्थापनाने माझ्याकडून ६० सहस्र रुपयांचा धनादेश घेतला आणि आईला सामान्य कक्षामध्ये (‘जनरल वॉर्ड’मध्ये) भरती करून घेतले.
महिला रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यावर प्रारंभी २ घंटे उपचार न केले जाणे, नंतर रुग्णाला ‘व्हेनफ्लो’ चुकीचा लावला जाणे आणि तो काढल्यावर त्यातून रक्त येणे; पण त्यावरही उपचार न केले जाणे
आईला रुग्णालयात भरती करून २ घंटे झाले, तरी त्यांनी तिच्यावर उपचार चालू केले नाहीत आणि मला आईजवळ थांबू देत नव्हते. मी पुष्कळ विनंती केल्यावर एक परिचारिका आईला ‘व्हेनफ्लो’ (सलाईनची नळी) लावण्यासाठी आल्या; परंतु त्यांनी तो चुकीचा लावला आणि तो काढल्यावर तेथे कापूसही लावला नाही. आईच्या हातातून रक्त तसेच वहात होते. तो सर्व प्रकार बघून मी आईला दुसर्या रुग्णालयामध्ये नेण्याचा निर्णय घेतला; पण रुग्णालयामधून खाली आल्यावर आईची तब्येत जास्तच बिघडली.
रुग्णाची तब्येत खालावल्याने रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकार्यांना पुष्कळ विनंती करणे, त्यानंतर रुग्णाला अतीदक्षता विभागामध्ये भरती केले जाणे आणि एका घंट्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित होणे
तेथे पुष्कळ लोक उभे होते; पण आई कोविड रुग्ण असल्याने कुणीही साहाय्य करत नव्हते. मी रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाला पुष्कळ विनंती केल्यावर त्याने रुग्णालयाच्या आर्.एम्.ओ. यांना (निवासी वैद्यकीय अधिकार्यांना) बोलावले. मी निवासी वैद्यकीय अधिकार्यांनाही पुष्कळ विनंती केली. त्यांच्या पाया पडले. तेव्हा त्यांनी आईला आय.सी.यू. वॉर्डमध्ये (अतीदक्षता विभागामध्ये) भरती करून घेतले. त्यानंतर ‘आईला व्हेंटिलेटर लावावे लागेल’, असे सांगितले. मी अतीदक्षता विभागात आईला बघण्याविषयी विचारणा केली असता मी आरोग्य कर्मचारी असूनही येऊ दिले नाही. त्यानंतर एका घंट्याने आईचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आईला आयसीयूत एक घंटाच भरती केल्याने रुग्णालयाने मला २९ सहस्र रुपये देयक भरण्यास सांगितले. आमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांनी माझ्याकडून २० सहस्र रुपयांचा धनादेश घेतला आणि रात्री १ वाजता आईचा मृतदेह ताब्यात दिला.
घरात आम्ही सर्वजण आजारी असल्याने आणि घराजवळच खासगी रुग्णालय असून तेथे चांगले उपचार मिळतील, या आशेने मी आईला तेथे भरती केले होते; परंतु तेथे पुष्कळ कटू अनुभव आले.
– एक साधिका
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव छापण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. हा लेख छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक |
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |