सिंधुदुर्ग जिल्ह्याला हानीभरपाईसाठी विशेष आर्थिक साहाय्य द्या ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हानीग्रस्त भागाची पहाणी

देवेंद्र फडणवीस

सिंधुदुर्ग – चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील मासेमार, आंबा आणि काजू बागायतदार, शेतकरी अन् सर्वसामान्य नागरिक यांची मोठी हानी झाली आहे. ही हानीभरपाई भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष आर्थिक साहाय्याची (पॅकेजची) घोषणा करून त्याची तात्काळ पूर्तता करावी, अशी मागणी जिल्हा दौर्‍यावर आलेले भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. या वेळी त्यांनी हानीग्रस्त काही भागांची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली आणि जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अन् वादळामुळे झालेली हानी यांविषयी चर्चा केली. या वेळी नेत्यांनी ‘जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात कोस्टगार्ड यंत्रणा तैनात असत्या, तर देवगड येथे खलाशांचा मृत्यू होण्यासारख्या घटना घडल्या नसत्या’, याकडे जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले.

भाजपच्या वतीने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत ‘कोविड केअर सेंटर’ उभारणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे बळी जात असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना वाचवण्यासाठी जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीनही विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या वतीने सुसज्ज ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजप कोरोना रुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न करणार आहे, तसेच अनेक कोरोनाबाधितांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी तीनही मतदारसंघांत भूमी उपलब्ध करून दिल्यास कोविड केअर सेंटर चालू करण्यात येईल. त्यासाठी प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी सहकार्य करावे, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी या वेळी केली.