‘नाटक’कार ममता !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० मे या दिवशी १० मुख्यमंत्री आणि ५४ जिल्हाधिकारी यांच्याशी ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे संवाद साधला. या वेळी संकटकाळात एकजुटीने काम करणे, कोरोनामुक्तीसाठी जनसामान्यांपर्यंत पोचणे, धैर्य आणि संवेदनशील राहून कार्य करणे, गतीशीलता या अन् अशा विविध सूत्रांवर त्यांनी भाष्य केले. सर्वच उपस्थितांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. अर्थात् पंतप्रधानांचे समर्थन केले की, कुणाच्या तरी पोटात दुखायला हवे ना ! या वेळीही तसेच झाले. सर्वांनी जरी मोदी यांनी सांगितलेल्या सूत्रांना दुजोरा दिला, तरी यात अपवाद ठरल्या त्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ! ‘जित्याची खोड मेल्याविना जात नाही’, असे म्हणतात. अगदी याचप्रमाणे पंतप्रधानांवर टीका करून तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही, तर त्या ममताबानो कसल्या ? या बैठकीनंतरही त्यांनी मोदी यांच्यावर तावातावाने टीका केली. त्या म्हणाल्या, ‘‘या बैठकीत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधीच दिली नाही. सर्व मुख्यमंत्र्यांची अवस्था कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे होती. हे अपमानास्पद आहे.’’ खरे पाहिले, तर पंतप्रधानांनी आयोजित केलेली बैठक ही अधिकतर जिल्हाधिकार्‍यांसाठीच होती; कारण कोरोनानिर्मूलनासाठी मोदींना गावपातळीपर्यंत प्रयत्न करायचे असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्यासंदर्भातील सूत्रांचे विवेचन बैठकीत करायचे आणि त्यानुसार त्याच्या कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री तेथे उपस्थित असणे आवश्यक होते. ‘इतकी साधी गोष्टही लक्षात न घेता ममता बॅनर्जी यांनी ‘आपण पंतप्रधानांपेक्षा कुणी मोठे आहोत’, असे दाखवून एकप्रकारे सर्वांसमोर स्वत:चे अज्ञानच पाजळले, ढोंगीपणा दाखवत स्वतःचे हसे करून घेतले’, असे म्हणावे लागेल. त्यांच्या नसानसांत प्रचंड मोदीद्वेष भरला असल्यानेच असे प्रकार घडतात. जरा कुठे खुट्ट झाले किंवा भाजपने कुठली योजना आणली की, आपले टीकेचे हत्यार उगारायचेच, हा ममता बॅनर्जी यांचा जणू नित्यक्रमच आहे. मोदींवर टीका केल्याविना त्यांना स्वस्थताच लाभत नसावी ! मोगलांना जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ‘संताजी-धनाजी’ दिसायचे, अगदी तसेच ममता यांना टीका करण्यासाठी एकमात्र ‘मोदी’च दिसत असतील !

असभ्यतेची लक्षणे !

केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांनी ‘ममता बॅनर्जी या नाटक करत आहेत’, असाच आरोप केला आहे; कारण ‘यापूर्वी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात कोरोनानंतर झालेल्या अन् त्याच्या आधी झालेल्या बैठकांना ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या नाहीत किंवा त्यांनी त्या बैठकांचा निषेध केला, हा आजवरचा इतिहास आहे’, असेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ‘ममता यांना नाटक करायचे असल्याने त्यांनी बंगालच्या २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील दंडाधिकार्‍यांना बोलू दिले नाही’, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या आतापर्यंतच्या बैठकांना ममताबानो का अनुपस्थित राहिल्या ? याचे उत्तर त्यांनी द्यावे. बंगालच्या जनतेनेही निवडून दिलेल्या या मुख्यमंत्र्यांना याविषयी खरेतर जाब विचारायला हवा. जेव्हा बोलायची संधी असते, तेव्हा ती घालवायची आणि नंतर विनाकारण कंठशोष करत बसायचा, हे न समजायला जनता काही दूधखुळी नाही. ‘२० मे या दिवशी झालेल्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्या, हे तर आश्‍चर्यच आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांचा सत्कारच करायला हवा’; ‘पंतप्रधानांनी बोलू दिले नाही, ते एका अर्थी बरेच झाले, अन्यथा विखारी आणि विद्वेषी वक्तव्येच त्यांनी केली असती’, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया नागरिकांनी सामाजिक माध्यमांवर व्यक्त केल्या आहेत. ‘मोदींनी बैठकीत बोलू दिले नाही’, हे सांगण्यासाठी ममता यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन केले. हे हास्यास्पद नव्हे का ? हा तर ‘बैल गेला आणि झोपा केला’, असाच प्रकार झाला. हे सर्व पहाता ‘मुख्यमंत्री असणार्‍या ममता यांना ‘सभ्यता’ किंवा ‘शिष्टाचार’ असे म्हणून काही आहे कि नाही ?’, असाच प्रश्‍न पडतो. सातत्याने आरोप आणि तक्रारी करायच्या, निषेध व्यक्त करायचा, भांडणे लावून द्यायची, या राजकीय जंजाळातून ममता बॅनर्जी कधी बाहेर येणार ? प्रत्येक वेळी असे गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा त्यांनी आता राज्यकारभाराकडे लक्ष द्यावे; पण ‘राजकारण आणि ममता’ हे समीकरण न संपणारे आहे. त्यामुळे तसे कदापि होणार नाही. कोरोनासारख्या प्रतिकूल काळात साहाय्य करणे तर दूरच; पण राजकारण करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत, हे पुष्कळ लाजिरवाणे आहे.

दुतोंडी मुख्यमंत्री !

प्रत्येक वेळी आपल्या चुका झाकून इतरांच्या उणिवांकडे पहाणारे असे मुख्यमंत्री राज्याचा विकास कसा काय साधणार ? बंगालच्या सद्य:स्थितीवरूनही ते लक्षात येतेच ! बंगालमध्ये निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाला; पण त्यानंतर करण्यात आलेल्या हिंसाचाराने संपूर्ण देश हादरला होता. या वेळी बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांनी काय केले ? स्वतःच्या राज्याला सांभाळणे तर दूरच; पण केले ते केवळ आणि केवळ गलिच्छ राजकारण ! या हिंसाचाराचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला. मोदींच्या बैठकीत बोलू न दिल्याचा आरोप करून त्याआडून ‘नाटकबाजी’ करणार्‍या ममता बॅनर्जी यांनी शांतता संपलेल्या बंगालमधील हिंसाचाराचे खरे स्वरूप देशासमोर आणावे. अर्थात् ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी स्थिती असल्याने सत्तेची लालसा बाळगणार्‍या ममता याविषयी ‘ब्र’ही काढणार नाहीत, हे निश्‍चित ! खरेतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या वेळी बंगालच्या राज्यपालांनी त्यांना ‘राज्यातील हिंसाचार बंद झाला पाहिजे’, अशी सूचना केली होती. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, ‘‘आतापर्यंत राज्यातील व्यवस्था निवडणूक आयोगाच्या हातात होती, आता मी आल्यानंतर नवीन व्यवस्था लागू करीन. राज्यातील जनतेला हिंसा आवडत नाही. हिंसाचार घडवणार्‍या लोकांची गय केली जाणार नाही.’’ प्रत्यक्षात तसे काहीही न होता हिंसाचार घडला आणि तो करणार्‍यांवर मात्र कारवाई झालीच नाही. ममताबानो यांचा हा दुतोंडीपणा नव्हे का ? ‘ममता यांच्या मर्जीविना बंगालमध्ये महिलांनी पाऊल ठेवल्यास त्यांच्यावर बलात्कार होतो’, असे विधान अनेक लोकप्रतिनिधी महिलांनी यापूर्वी केले होते. पंतप्रधानांवर टीका करण्यात अग्रेसर असणार्‍या ममताबानो यांनी स्वतःच्या राज्याच्या (दु:)स्थितीकडे लक्ष द्यावे, तसेच ‘टीका करतांना एक बोट जरी समोरच्याकडे असले, तरी उर्वरित बोटे स्वत:कडे असतात’, हे कदापि विसरू नये !