लसीकरण केंद्रात लस आहे कि नाही, हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी

नवी देहली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ९०१३१५१५१५ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक प्रसिद्ध केला आहे. या क्रमांकाच्या साहाय्याने नागरिकांना ‘त्यांच्या परिसरात असलेल्या लसीकरण केंद्रात लस उपलब्ध आहे कि नाही ?’ याची माहिती मिळू शकणार आहे. त्यासाठी या क्रमांकावर केवळ एक संदेश पाठवावा लागणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर या क्रमांकावर जाऊन नागरिकांना त्यांच्या भागाचा पिन कोड टंकलेखन करून पाठवावा लागणार आहे. त्यानंतर त्या भागात असलेल्या लसीच्या उपलब्धतेविषयी अधिकृत माहिती मिळणार आहे.

सरकारी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, त्यामुळे लस घेण्यासाठी फार त्रास घ्यावा लागणार नाही. तसेच अनावश्यकपणे वारंवार कुठल्याही केंद्रावरही जावे लागणार नाही. जेव्हा व्यक्तीचा क्रमांक येईल, तेव्हा एकवेळ लसीविषयी अवश्य अपडेट घ्यावे. त्यानंतर लसीकरण केंद्रात जाऊन कोरोनावरील लस घ्यावी.

आता घरातच करू शकणार रँपिड अँटिजन टेस्ट !

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आय.सी.एम्.आर्.ने) कोरोनाची चाचणी घरामधूनही करता येण्यासाठी रँपिड अँटिजन टेस्टसाठीच्या एका किटला अनुमती दिली आहे. या किटच्या माध्यमातून लोक घरामध्येच नाकाच्या माध्यमातून कोरोना चाचणीसाठी नमुना घेऊ शकतील.